धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याशिवाय आंदोलन थांबणार नाही; संघर्ष तीव्र करू – कॉ. नरसय्या आडम मास्तर

नीट परीक्षेतील कथित गैरव्यवहार, विद्यार्थ्यांच्या मृत्यूच्या घटना आणि दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थी-युवकांवरील कथित पोलिस लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)च्या वतीने गुरुवारी (दि. २३ जुलै) जिल्हा परिषद, पूनम गेट येथे आक्रमक निदर्शने करण्यात आली. या आंदोलनाचे नेतृत्व पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार कॉ. नरसय्या आडम मास्तर यांनी केले. यावेळी बोलताना त्यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नीट परीक्षेतील कथित गैरव्यवहाराची नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी केली. तसेच राजीनामा होईपर्यंत आणि शिक्षण व्यवस्था पारदर्शक व विद्यार्थीहिताची होत नाही तोपर्यंत संघर्ष अधिक तीव्र करण्याचा इशाराही त्यांनी दिला. आडम मास्तर म्हणाले की, नीट परीक्षेतील कथित पेपरफुटीमुळे अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले असून शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थी-युवकांवर लाठीमार व अश्रुधुराचा वापर करणे ही लोकशाहीविरोधी कृती असल्याचा आरोप त्यांनी केला. आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी "धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो", "नीटच्या विद्यार्थ्यांना न्याय मिळालाच पाहिजे", "शिक्षण आमच्या हक्काचे आहे" अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. विद्यार्थ्यांच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी तसेच मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत द्यावी, अशीही मागणी यावेळी करण्यात आली.

प्रजा नाट्य मंडळाच्या कलापथकाने शाहीर प्रशांत म्याकल, अरुण सामल आणि चंद्रकांत मंजुळकर यांच्या क्रांतिकारी गीतांद्वारे आंदोलनाला सांस्कृतिक बळ दिले. या आंदोलनात माकपचे राज्य सचिव मंडळ सदस्य कॉ. एम. एच. शेख, जिल्हा सचिव कॉ. युसूफ शेख (मेजर), जनवादी महिला संघटनेच्या राज्य अध्यक्षा नसीमा शेख, ॲड. अनिल वासम, दत्ता चव्हाण, सुनंदा बल्ला, व्यंकटेश कोंगारी, डीवायएफआय, एसएफआयचे पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले.