'या' जिल्ह्यांसाठी इच्छुकांची स्पर्धा
.jpeg)
जिल्ह्याच्या राजकारणावर वर्चस्व ठेवण्यासाठी पालकमंत्रिपद
हे महत्त्वाचे ठरते. विशेषतः जिल्हा नियोजन समितीकडील निधीचे वाटप हे
पालकमंत्र्यांच्या अधिकारात होते. तसेच जिल्ह्याची प्रशासकीय व पोलीस यंत्रणा
हातात राहते. यासाठीच प्रत्येक मंत्र्याला आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्रिपद मिळावे, अशी अपेक्षा असते. त्यातच मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर झाल्यावर
पालकमंत्रिपदावरून महायुतीतील तिन्ही पक्षांमध्ये चढाओढ सुरू होणार आहे. विशेषतः
ठाणे, रायगड, पुणे, सातारा अशा काही जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदावरून आधीच कुरबुरी सुरू
झाल्या आहेत.
पालकमंत्रिपदासाठी ठाणे, पुणे, रायगड,
नाशिक, बीड, सातारा,
छत्रपती संभाजीनगर, जळगाव, रत्नागिरी, कोल्हापूर व यवतमाळ अशा ११ जिल्ह्यात
पालकमंत्रिपद कोणाला मिळणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष
लागले आहे. काही जिल्ह्यांना दोन, तर काही जिल्ह्यांना चार
मंत्रिपदे मिळाली आहेत. त्यामुळे पालकमंत्रिपदासाठी तीव्र स्पर्धा आहे. कुठे एकाच
पक्षाच्या दोन मंत्र्यांमध्ये, तर कुठे मित्रपक्षाच्या
मंत्र्यांमध्ये जोरदार चढाओढ दिसत आहे. त्यामुळे मंत्रिपदाची शर्यत संपताच
पालकमंत्रिपदासाठीची स्पर्धा सुरु झाली आहे.
पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रिपद हे उपमुख्यमंत्री अजित पवार
यांच्याकडेच कायम राहील, अशी चिन्हे आहेत. पण भाजपचे ज्येष्ठ
मंत्री चंद्रकांत पाटील यांचाही या पालकमंत्रिपदावर डोळा आहे. अजित पवार हे
महायुतीत सहभागी होण्यापूर्वी चंद्रकांतदादांकडेच पालकमंत्रिपद होते.
पुण्यासारख्या महत्त्वाच्या जिल्ह्याचे पालकमंत्रिपद भाजपकडे राहावे, अशी पाटील यांची भूमिका असल्याचे समजते. रायगडच्या पालकमंत्रिपदावरूनही
वाद होण्याची चिन्हे आहेत. आदिती तटकरे यांना पालकमंत्रिपदी नेमू नये, अशी जिल्ह्यातील शिवसेनेच्या आमदारांची मागणी आहे. भरत गोगावले हे आपण
पालकमंत्री होणार, असे वारंवार जाहीर करतात. एकनाथ शिंदे हे
मुख्यमंत्रिपदी असताना ते गोगावले यांना झुकते माप देत असत. मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस हे कदाचित आदिती तटकरे यांच्यासाठी सुनील तटकरे यांचा आग्रग मान्य करण्याची
शक्यता नाकारता येत नाही. कारण निकालानंतर राष्ट्रवादीचे नेते फडणवीस यांच्या अधिक
नजीक गेले आहेत.
ठाणे जिल्ह्यावर आपले वर्चस्व कायम राहावे, हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रयत्न राहणार आहे. भाजपला
पालकमंत्रिपद हवे आहे. कारण जिल्ह्यात भाजपचे आमदार जास्त आहेत. गणेश नाईक यांनी
ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्रिपद भूषविले आहेत. सातारा जिल्ह्यामध्ये शंभूराज देसाई
(शिवसेना), शिवेंद्रराजे भोसले (भाजप), जयकुमार गोरे (भाजप), मकरंद पाटील (राष्ट्रवादी
काँग्रेस) या चारजणांमध्ये चुरस आहे. साताऱ्यातील सर्वाधिक चारजणांचा मंत्रिमंडळात
समावेश झाला आहे. प्रत्येकालाच पालकमंत्रिपदाची ओढ लागली आहे. शिंदे सरकारमधील
शंभूराज देसाई यांना पालकमंत्रिपद आपल्याकडेच कायम राहावे, असे
वाटते. राष्ट्रवादीचाही डोळा आहे. सातारा लोकसभा तसेच विधासभेत मिळालेल्या यशानंतर
भाजपचे शिवेंद्रराजे भोसले यांनाही पालकमंत्रिपदाचे वेध लागले आहेत. रत्नागिरी
जिल्ह्यात उदय सामंत (शिवसेना), योगेश कदम (शिवसेना) या
दोघांपैकी एकाला संधी मिळणार आहे, तर कोल्हापूर जिल्ह्यात
हसन मुश्रीफ (राष्ट्रवादी काँग्रेस), प्रकाश आबिटकर
(शिवसेना) या दोघांपैकी कोणाची निवड होणार, याकडे लक्ष लागले
आहे.
नाशिक जिल्ह्यात गिरीश महाजन (भाजप), दादा भुसे (शिवसेना), नरहरी झिरवळ (राष्ट्रवादी
काँग्रेस), माणिकराव कोकाटे (राष्ट्रवादी काँग्रेस) या चार
जणांमध्ये स्पर्धा लागली आहे. जळगाव जिल्ह्यात गुलाबराव पाटील (शिवसेना), संजय सावकारे (भाजप) या दोनजणांपैकी एकाची निवड करावी लागणार आहे. नाशिकचे
पालकमंत्रिपद भाजपकडे कायम राहावे, असा पक्षाचा प्रयत्न
असेल.
जिल्ह्यातील राजकारणावर पकड निर्माण करण्याकरिता
राष्ट्रवादीकडून माणिकराव कोकाटे यांच्या नावाचा आग्रह धरला जाऊ शकतो. बीड
जिल्ह्यात पंकजा मुंडे (भाजप), धनंजय मुंडे (राष्ट्रवादी काँग्रेस) या
दोघांपैकी एकाची निवड करावी लागणार आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात संजय शिरसाट
(शिवसेना), अतुल सावे (भाजप) या दोघांत कोण बाजी मारणार,
याची उत्सुकता आहे. यवतमाळ जिल्ह्यात अशोक उईके (भाजप), संजय राठोड (शिवसेना), इंद्रनिल नाईक (राष्ट्रवादी)
या तीनपैकी एकाची वर्णी लागणार आहे.
१६ जिल्ह्यांना मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व मिळालेले नाही.
एका जिल्ह्यात एकापेक्षा अधिक मंत्रिपदे आहेत, अशा मंत्र्यांची प्रतिनिधित्व नसलेल्या
जिल्ह्यांमध्ये पालकमंत्रिपदी निवड केली जाईल. मंत्रिमंडळात दोन
उपमुख्यमंत्र्यांसह ३५ कॅबिनेट मंत्री असल्याने राज्यमंत्र्यांनाही फार संधी मिळणे
कठीण आहे.