भाजपचा महामंत्र फोडा आणि जोडा गेल्या आठवड्यात दोन विषय

दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे झालेले पानिपत आणि दुसरा म्हणजे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालावर केलेलं भाष्य! खरं तर दोन्ही विषय एकाच जातकुळीतले. राजकीय विषय असल्याने पुढचे काही दिवस तरी लोकांना ते आवडीने चघळायला पुरेसे आहेत. या चर्चेतून काय निष्पन्न होईल माहीत नाही, परंतु लोकांची मात्र छान करमणूक होत आहे. दल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल जसे अपेक्षित होते तसेच ते लागले आहेत. परंतु ज्या हिमतीने काँग्रेस या निवडणुकीत उतरली होती ती हिंमत खोल पाण्यावरचा बुडबुडा ठरली. कारण इतका दारुण पराभव होईल असे वाटले नव्हते. गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत चांगले यश प्राप्त केल्यानंतर काँग्रेसला दिल्लीचे तख्त सहज मिळवू असे वाटले असावे. पक्षाच्या नेत्यांची जाहीर सभांमधली भाषा तशीच होती. त्यात विश्वास कमी, अहंकार ठासून भरलेला दिसत होता. परिणाम निकालात दिसून आला. जे महाराष्ट्रात घडले त्याची पुनरावृत्ती दिल्लीत पाहायला मिळाली. भारतीय जनता पक्षाने दोन्ही महत्त्वाच्या राजधान्या ताब्यात घेतल्या आहेत. आधी महाराष्ट्र विधानसभा जिंकून मुंबईवर कब्जा मिळवला. आता दिल्लीची सत्ता आम आदमी पक्षाच्या ताब्यातून खेचून घेतली आहे. 1993 नंतर प्रथमच पुन्हा प्रचंड बहुमत मिळवून सत्तेत पुनरागमन केले आहे. काहीही झाले तरी दिल्ली जिंकायचीच अशा निर्धाराने भाजप निवडणुकीच्या मैदानात उतरला होता. नेहमीप्रमाणे मतदारांवर घोषणांचा पाऊस पाडण्यात आला. पाचशे रुपयांत स्वयंपाकाचे गॅस सिलिंडर, अटल कॅन्टीनवर पाच रुपयात भोजन, महिलांना दरमहा 2500 रुपये अशा योजना देऊन भाजपने मध्यमवर्गीय मतदारांना आकर्षित केले. आठव्या वेतन आयोगामुळे नोकरदार खूश झाले. केंद्रीय अर्थसंकल्पात बारा लाखापर्यंत आयकर माफ करुन लोकांची मनं जिंकली. या निर्णयाचे प्रतिबिंब निवडणूक निकालात उमटणे स्वाभाविक होते आणि झालेही तसेच. 70 पैकी 40 मतदारसंघात महिलांनी चमत्कार घडवला. अरविंद केजरीवाल यांच्यावर मुख्यमंत्री पदापाठोपाठ दिल्लीची खुर्चीदेखील गमावण्याची वेळ आली. दिल्लीच्या निवडणुकीत काँग्रेस आणि आप या दोन्ही पक्षांच्या चुका भाजपच्या पथ्यावर पडल्या. अनेक ठिकाणी मतविभाजनाचा फायदा भाजपला झाला. हे विभाजन आप आणि काँग्रेसला टाळता आवे असते. परंतु अहंकाराची बाधा दोन्ही पक्षाला झाली. मोठी परंपरा सांगणार्या काँग्रेसला सलग तिसर्यांदा विजयाचा भोपळा फोडता आला नाही. ही नामुष्की पक्ष नेतृत्वाने ओढवून घेतली आहे. त्यांना मतदारांचा विश्वास संपादन करता आला नाही. लोकसभेच्यावेळी असलेली भाजप विरोधाची धार त्यांना कायम ठेवता आली नाही. आपला अॅन्टी इन्कम्बन्सीचा जसा फटका बसला तसा तो नवे चेहरे कमी उतरवल्यानेदेखील बसला आहे. त्यामुळेच केजरीवालांसह जुन्या साथीदारांना लोकांनी घरी बसवण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीतील वाढीव मतदानाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाने याबाबतीत आक्रमक पवित्रा घेतला आहे. राहुल गांधी, सुप्रिया सुळे तसेच संजय राऊत यांनी अलीकडेच पत्रकार परिषद घेऊन मतदानाच्या आकडेवारीवर शंका उपस्थित केली. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकी दरम्यान पाच महिन्यात वाढलेली मतदारसंख्या संशयास्पद वाटते. निवडणूक आयोगाकडे नोंद असलेली मतदारसंख्या 9 कोटी 70 लाख आहे. प्रत्यक्षात राज्यात प्रौढ लोकसंख्या 9 कोटी 54 लाख आहे. या विसंगतीकडे राहुल गांधी यांनी लक्ष वेधले आहे. मध्यंतरी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनीदेखील ही शंका उपस्थित केली होती. राज्यातील अनेक मतदारसंघात घोळ असल्याची चर्चा आहे. सोलापूर जिल्हादेखील याला अपवाद नाही. सोलापूर दक्षिण मतदारसंघात पाच महिन्यापूर्वी भाजपला दहा हजार मतं कमी मिळाली होती. विधानसभा निवडणुकीत 78 हजाराचे मताधिक्य मिळाले आहे. असाच प्रकार इतर काही मतदारसंघात झालेला पाहायला मिळतो. ज्यांचा पराभव होणार असा निष्कर्ष एक नव्हे तर तीनवेळच्या सर्व्हेतून पुढे आलेला असताना तो उमेदवार चांगले मताधिक्य मिळवून विजयी होतो हा कलियुगातला चमत्कारच म्हटला पाहिजे. मतदानयंत्राचा घोळ आहे, पण तो विरोधकांना दाखवता येईना. मागे एकदा मुंबई महापालिकेचे उपायुक्त गो. रा. खैरनार भ्रष्टाचाराच्या खटल्याविषयी आपली बाजू मांडताना असं म्हणाले होते की, न्यायालय भ्रष्टाचाराचे पुरावे मागते. भ्रष्टाचार करणारे पुरावे नष्ट करतात. अंधार दिसतो पण त्याचा पुरावा देता येत नाही. न्यायालय पुरावे दिल्याशिवाय शिक्षा करत नाही. मतदानयंत्राचा घोळ असाच आहे. निवडून आलेल्या अनेक आमदारांना अजूनही आपल्या विजयाबद्दल विश्वास वाटत नाही. राहुल गांधी अंधाराचा पुरावा शोधत आहेत.
महाराष्ट्र आणि दिल्ली विधानसभा
निवडणुकीच्या निकालाने भाजपचा उत्साह वाढला आहे. येणार्या स्थानिक स्वराज्य
संस्थांच्या निवडणुकीत आपणच विजयी होणार असे या पक्षाचे कार्यकर्ते दिमाखात सांगत
आहेत. ‘शतप्रतिशत भाजप’ हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सदस्य नोंदणी मोहीम सुरु आहे.
या नोंदणीतील हेराफेरीचे किस्से कानोकानी ऐकू येत आहेत. रेकॉर्ड ब्रेक नोंदणीबद्दल
कौतुक सोहळेदेखील सुरु आहेत. ‘ऑपरेशन टायगर’, ‘ऑपरेशन लोटस’ अशा मोहिमा घेऊन
काही आमदार, मंत्री, नेते राज्यात फिरत आहेत. ‘फोडा आणि जोडा’ हा नवा
महामंत्र कार्यकर्त्यांना दिला आहे. खासदार झाले, आमदारही फोडून झाले. त्यामुळे
राजकारण बदलले. सत्ता बदलली. महाराष्ट्र आणि दिल्लीचे तख्त असेच मिळविले. आता
स्थानिक स्वराज्य संस्था ताब्यात घेण्यासाठी हाच फार्म्युला वापरला जाणार आहे.
तेव्हा परीक्षा निष्ठेची, अस्मितेची आणि स्वाभिमानाची आहे. त्यासाठी आणखी काही काळ
प्रतीक्षा करावी लागेल. कारण महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, पंचायत समितीच्या निवडणुकीला बराच वेळ आहे.
‘दिल्ली’ अभी दूर है...! असंच म्हणावं लागेल. प्रशांत जोशी- मोबा. 9637825927