उसाचे पाचट पेटवल्याने शेतीचेच नुकसान

कुंभारी, दि. १० -

सध्या ऊसतोडणीचे काम जोरात सुरू आहे. उसाचे फड रिकामे झाले की, शेतकरी शक्यतो पाचट पेटवून खोडवा उसाची तयारी केली जाते. मात्र, हेच पाचट जमिनीत कुजवले तर जमिनीचे आरोग्य सुधारते. शेतकऱ्यांनी ऊसतोडीनंतर शेतातील पाचटाचे योग्य पद्धतीने नियोजन केल्यास शेतात सेंद्रिय खतनिर्मिती होते. त्यामुळे खोडवा उसाला रासायनिक खतांची मात्रा कमी लागते व शेतकऱ्यांचाही खर्च वाचतो. पाचटामुळे अच्छादन झाल्याने उन्हाळ्यात पाण्याची बचत होते. तरीही बहुतांश शेतकरी उसाचे पाचट पेटवतात. त्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसानच होते. यासाठी शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून मार्गदर्शनाची आवश्यकता आहे.

अनेक शेतकऱ्यांची ऊसतोडणी सुरू

झाली आहे. ऊस तुटून गेल्यानंतर बहुतांशी शेतकरी पाचट सरीत न टाकता किंवा त्याची कुट्टी न करता ते जाळून टाकणे पसंत करतात; पण यामध्ये शेतकऱ्यांनी बदल करणे गरजेचे आहे. एक एकर क्षेत्रात सुमारे चार टन पाचट निघते. ऊस तुटल्यावर निघणारे पाचट न जाळता ते खोडव्यामध्ये

सरीत किंवा पटट्यात व्यवस्थित पसरून टाकले, तर त्याचा फायदा उन्हाळ्यातच आच्छादन म्हणून होतो.

शेतात कंपोस्ट खत म्हणून वापर होतो. एवढेच नाही, तर पाचट कुजवल्याने पर्यावरणाचे संवर्धन होणार आहे.

उसाचे पाचट जाळले तर

जमिनीला उपयुक्त असलेले घटक नष्ट होतात. वातावरणदेखील प्रदूषित होते. याच पाचटाची कुट्टी करून जमिनीत कुजवले, तर मात्र जमिनीचा पोत सुधारतो.

पाचटाच्या अच्छादनामुळे उन्हाळ्यात पाण्याचे होणारे बाष्पीभवन रोखले जाते. त्यामुळे पाण्याची बचतही होते. पाचटाच्या अच्छादनामुळे उसात पुन्हा तणही लवकर येत नाही. जमीन सुपिकतेसाठी उपयुक्त गांडूळ जीवजंतूचे संवर्धन होते. त्यामुळेच उसाचे पाचट जाळण्यापेक्षा ते शेतामध्ये कुजवणे हे शेतकऱ्यांसाठी तसेच शेतीसाठी फायद्याचे राहणार आहे.