आंतर्बाह्य देखणा माणूस

२६ सप्टेंबर २०२२ला संध्याकाळी भावार्थचा फोन आला, 'बाबा गेले.' काळजाचा ठोका चुकला. आदल्याच दिवशी
डॉ. रामचंद्र देखणे सरांशी फोनवर बोलणे झाले होते. लवकरच भेटण्याचे ठरले होते.
बातमी आली ती त्यांच्या निधनाची. महिषासुर मर्दिनीचे स्तोत्र म्हणतानाच ते कोसळले.
हृदयविकाराच्या झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली. माणूस पराक्रमी असला तरी
नियती मोठी क्रूर असते हेच खरे. आकस्मिक घडलेले हे अविश्वसनीय आणि अनाकलनीय होते.
हॉस्पिटलमध्ये भावार्थला पाहिल्यानंतर भावनांचा बांध फुटला. पांडुरंगाच्या
आत्मरुपाशी एकरूप झालेले देखणे सर शांत झोपल्यासारखे दिसत होते. इतक्या वर्षांच्या
सहवासात त्यांना इतक्या शांतपणे झोपलेलं मी कधीच पाहिलं नव्हतं. वाचन, मनन, चिंतन, नामस्मरण, लेखन, व्याख्याने आणि भारुडांचे कार्यक्रम, त्यासाठीचा प्रवास यात ते दंग असायचे. त्यांच्या घरी माणसांचा अखंड राबता
असायचा. महाराष्ट्राच्या कोनाकोपऱ्यातून लोक कधीकधी त्यांची वेळ न घेताही त्यांना
भेटण्यासाठी यायचे. सरांची कधीच तक्रार नसायची. वहिनी आणि त्यांची सून पूजा
हसतमुखाने सर्वांच्या स्वागतासाठी तत्पर असायच्या. देखणे सर सर्वांशी भरभरून
बोलायचे. विद्वत्ता आणि व्यासंग यांच्या जोडीला असलेली विनम्रता आणि साधेपणा या
गुणांमुळे त्यांचे लाघवी व्यक्तिमत्त्व लोकांच्या आदराचा, कौतुकाचा आणि भक्तीचा विषय बनले होते. उमद्या व्यक्तिमत्त्वाच्या, संत साहित्याच्या या अभ्यासकाने आणि लोकसंस्कृतीच्या उपासकाने 'लोक' नावाच्या शक्तीचा जन्मभर आदरच केला
म्हणूनच त्यांना केवळ लोकप्रियता मिळाली नाही, उदंड लोकप्रेमाचेही ते धनी झाले. त्यांच्यावर निखळ आणि निर्मळ प्रेम
करणाऱ्या विविध क्षेत्रातील स्नेहांकितांची मांदियाळी हे त्यांनी मिळवलेले मोठे
लोकवैभव आहे. ज्ञानी माणसांच्या वाट्याला ते सहसा येत नाही. देखणे सर त्याला अपवाद
होते, देखणे सरांनी माझ्यावर लहान भावाप्रमाणे प्रेम
केले. बार्शीच्या माझ्या घरी मी बार्शीत नसलो तरी ते हक्काने जात. घरापासून पाच
पावलांवर असणाऱ्या भगवंताच्या मंदिरात जाऊन दर्शन घेऊन मग ते पुढच्या प्रवासाला
जात. निवांतपणे गप्पा मारण्यासाठी तास-दोन
प्रा. डॉ. मिलिंद जोशी
तासांचा वेळ काढून मी त्यांच्याकडे दोन महिन्यातून एकदा तरी जात असे. जेवायला घातल्याशिवाय ते सोडायचे नाहीत. मुगाची खिचडी, पिठलं-भाकरी, भजी, ठेचा असा दोघांच्याही आवडीचा बेत बहिनींनी केलेला असायचा. सर्वांबरोबरच गप्पा इतक्या रंगलेल्या असायच्या की पायच निघायचा नाही. मनातल्या गोष्टी बोलण्यासाठी देखणे सर हे माझ्यासाठी हक्काचं आणि विश्वासाचं ठिकाण होतं. ३५ वर्षे पंढरीची वारी करणारे देखणे सर सब्बे वारकरी होते. त्यांनी मला 'वारी'शी जोडले. त्यांच्या आग्रहामुळे मी सलग बारा वर्षे फलटणमुक्कामी मुधोजी महाविद्यालयाच्या परिसरात मुक्कामाला असणाऱ्या त्यांच्या दिंडीत व्याख्याने दिली. महाराष्ट्र साहित्य परिषदेवर त्यांचा विशेष लोभ होता. प्रमुख पाहुणे म्हणून तर ते कार्यक्रमांना अनेकदा आलेच पण श्रोता म्हणूनही कसलाही मोठेपणाचा आव न आणता सहजतेने येत राहिले. संतसाहित्याचे व लोकसाहित्याचे तसेच लोककलेचे व्यासंगी अभ्यासक, ललित लेखक, व्याख्याते, प्रवचनकार तसेच बहुरूपी भारूड कलाकार, अशी देखणे सरांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाची विविध रूपे होती. सरांनी त्यांच्या आयुष्याची उभारणी मोठ्या कष्टातून केली. लहानपणी त्यांनी गुरं वळली, शेतात दारं धरली, दुष्काळात रोजगार हमीच्या कामावर आईवडिलांबरोबर काम केलं. प्रतिकूल परिस्थितीचे चटके सहन करुनही त्यांच्या जगण्यावागण्यात कधीही कडवटपणा किंवा अहंकाराचा दर्प नव्हता. त्यांच्या मनात संतसाहित्याविषयीची ओढ निर्माण झाली ती वारकरी असणाऱ्या त्यांच्या वडिलांमुळे. जात्यावर दळण करताना ओव्या म्हणणाऱ्या आईपासून ते दारावर येणारे वासुदेव, गोंधळी, मुत्या, जोशी, कडकलक्ष्मी, आंधळा, विंचू या लोककलाकारांनी त्यांच्यावर लोकवाङ्मयाचे आणि लोकसंगीताचे संस्कार केले. लहानपणी नकला करणे, पोवाडा सादर करणे, लळीत, भारुडे आणि कथाकथनांचे कार्यक्रम करणे यामुळे त्यांच्या गावात 'गमत्या माणूस' म्हणून सर्वांना ज्ञात असलेल्या देखणे सरांमधला लोककलाकार अधिक सजग होत गेला. 'भारूड' हा विषय त्यांनी पीएच. डी. साठी निवडला तो त्यांच्या आईमुळे. आईला भारुडाचा अर्थ समजावून सांगण्यासाठी प्रथम त्या भारूडाची रूपके स्वतः समजावून घ्यावीत यासाठी 'भारूड वाङ्मयातील तत्त्वज्ञान' या विषयावर त्यांनी संशोधन केले. भारूड हे अंगणातील लोकविद्यापीठ आहे, असे मानणाऱ्या देखणे सरांनी महाराष्ट्रात, महाराष्ट्राबाहेर आणि परदेशातही शास्त्रशुद्ध भारूडांचे हजारो कार्यक्रम करून भारूडांना पुन्हा लोकप्रियता मिळवून दिली. कीर्तनाइतकीच प्रभावीपणे प्रबोधन करणारी लोककला म्हणून भारुडाकडे पाहिले जाते, 'बहुरूढ' वरून भारूड हा शब्द आला. भर म्हणजे जनसमुदाय आणि त्यावर आरूढ असणारे जनसमुदायासंबंधीचे जे गीत ते म्हणजे भारूड होय. हा कलाप्रकार समाजप्रबोधनासाठी फारच उपयुक्त आणि प्रभावी असल्यामुळे बऱ्याच संतसंप्रदायांनी त्याचा उपयोग करून घेतला आहे. मराठीत प्रथम मारुडांची निर्मिती केली ती संत ज्ञानदेवांनी आणि भारूडाला शिखरावर आरूढ करण्याचे काम केले ते संत एकनाथांनी, अध्यात्म आणि साहित्य, काव्य आणि नाट्य, विनोद आणि संवाद, कला आणि संगीत, उद्बोधन आणि रंजन यांचा समन्वय साधत अध्यात्म विचारांचे रूपकात्मक लोकवाङ्मयीन दर्शन नाथांच्या भारुडांतून घडले आणि 'भारूड' या लोककलेला कमालीची लोकप्रियता मिळाली; परंतु पुढे पुढे भारुडांतील रूपकाकडे फारसे लक्ष न दिल्यामुळे भारुडे केवळ मनोरंजनाचा एक भाग म्हणून सादर होऊ लागली. भारूडाचे निरूपण, रूपकांचे सादरीकरण आणि लोकभूमिका व त्यांचे स्वरूप याचे विवेचन करीत नृत्य, नाट्य, संवाद, संगीत यासह पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि कसलेल्या कलाकारांच्या सहकार्याने बहुरूपी भारुडांचा कार्यक्रम सादर करून देखणे सरांनी लोप पावत चाललेल्या या लोककलेचे पुनरुजीवन करून तिला प्रतिष्ठा मिळवून दिली. साहित्य संमेलनापासून ते गावगाड्यापर्यंत, फेस्टिव्हलपासून गावजत्रेपर्यंत आणि मंदिरापासून रंगमंदिरापर्यंत कोणताही व्यावसायिक दृष्टिकोन न ठेवता सादर केलेल्या या बहुरूपी भारुडांच्या कार्यक्रमामुळे बुद्धिजीवी वर्गापासून ते अक्षरओळख नसणाऱ्या सामान्य माणसांपर्यंत सर्वांनीच या आगळ्यावेगळ्या आविष्काराला भरभरून दाद दिली. त्यांच्या या बहुरूपी भारुडाच्या कार्यक्रमात लहान मुलापासून ते सत्तर वर्षांच्या ज्येष्ठापर्यंत सर्व वयोगटांतील कलाकार होते. अनेक कलावंतांच्या या संचात स्वतः देखणे सर, त्यांच्या पत्नी अंजली, भगिनी माई, चिरंजीव भावार्थ, कन्या पद्मश्री आणि गोरज व सुकृत ही नातवंडे सहभागी होत. लोककलेची घराणी चालविणारी ही मंडळी आहेत. दृष्टांत, सिद्धांत आणि प्रमाण यांच्या अंगाने निरूपण करीत संबळ, शिंग, चौघडा, मृदंग, टाळ, वीणा, दिमडी या पारंपरिक वाद्यांच्या गजरात दिंडी सोहळा, वाटचालीचा अभंग, वासुदेव, कडकलक्ष्मी, वेडी, विंचू, जोशी, बैरागी, जावाई, भुत्या, गोंधळी, मुका, जोगवा असा बहुरूपी मारुडाचा कार्यक्रम बहरत जात असे आणि प्रेक्षक तल्लीन होऊन जात. पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण येथे जनसंपर्क आणि प्रसिद्धी अधिकारी म्हणून कार्यरत राहिलेले देखणे सर आपल्या अंगावरील अधिकाऱ्याचा वेष उतरवून लोककलेची कवडी आणि वासुदेवाची मोरपिसाची टोपी घालून जेव्हा 'वासुदेव आला रे वासुदेव आला...' हे भारूड सादर करत, तेव्हा त्यांच्यातील व्रतस्थ आणि निगर्वी लोककलाकाराचे दर्शन घडायचे. लोककलेचा गोंधळ घालत मूल्यांचा जोगवा मागणाऱ्या या लोककलाकाराला महाराष्ट्र शासनाने 'सांस्कृतिक राज्य पुरस्कार' देऊन २००३ मध्ये सन्मानित केले. जगद्रुरू शंकराचार्यांच्या हस्ते त्यांना 'भारुडाचार्य' हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाला. पुणे विद्यापीठात देखणे सरांच्या बहुरूपी भारुडाचा कार्यक्रम होता. 'कडकलक्ष्मी' हे भारूड सादर करताना सर उघड्या अंगावर चाबकाने कडाका मारून घेत होते. ते पाहिल्यानंतर कुलगुरू अरुण निगवेकर व्यासपीठावर आले आणि म्हणाले, 'संशोधन करून पीएच. डी. संपादन करणारे खूप विद्वान असतात; पण समाजप्रबोधनासाठी उघड्या अंगावर कडाका मारून घेणारा डॉ. देखणेंसारखा संशोधक विरळाच.' ल.रा. पांगारकरांची संतसाहित्याची चिंतनाच्या अंगाने मांडणी करण्याची आणि सोनोपंत दांडेकरांची निरुपणाच्या अंगाने विचारांच्या गाभ्यापर्यंत घेऊन जाण्याची परंपरा तसेच डॉ. रा. चिं. ढेरे यांची लोकतत्त्वीय दृष्टीचा अवलंब करीत अभिजनांध्या संस्कृतीपेक्षा बहुजनांच्या संस्कृतीला प्राधान्य देण्याची संशोधन परंपरा, या परंपरांची पालखी देखणे सरांनी दिमाखात मिरवत मौलिक काम केले. कथा, कादंबरी, बालसाहित्य, संतसाहित्य, लोकसाहित्य, वैचारिक, चिंतनात्मक आणि संशोधनात्मक अशा विविध प्रकारात देखणे सरांनी कसदार साहित्यनिर्मिती केली. त्यांची पन्नासहून अधिक पुस्तके प्रकाशित झाली. बहुरूपी महाराष्ट्र, लागे शाहिरी गर्जाया, महाराष्ट्राची सांस्कृतिक लोककला, गोंधळ : परंपरा, स्वरूप आणि आविष्कार, गौळण वाड्मय आणि स्वरुप, अंगणातील विद्यापीठ, महाकवी, सुधारकांचा महाराष्ट्र, कर्मयोगाचे नीतिशास्त्र, वारीः स्वरुप आणि परंपरा, संत साहित्यातील पर्यावरण विचार हे सरांचे अक्षरधन पुढच्या अनेक पिढ्यांसाठीचा अनमोल ठेवा आहे. लेखणी आणि वाणी ही शब्दशक्तीची दोन्ही रुपे त्यांच्यावर प्रसन्न होती. त्यांचे लेखन जसे अभ्यासपूर्ण तरीही प्रासादिक तसेच त्यांचे बोलणेही. गुलाबाच्या पाकळ्या उलगडत उलगडत संपूर्ण फुलाचे सर्वांगसुंदर दर्शन घडावे तसे ते कठीण विषयाची ललितरम्य शैलीत मांडणी करून श्रोत्यांना अवघड विषयाच्या मुळापर्यंत घेऊन जात. त्यामुळे त्यांना महाराष्ट्रात, बृहन्महाराष्ट्रात आणि परदेशातही मोठा श्रोतृवर्ग मिळाला. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी त्यांचे नाव चर्चेत होते. ते असते तर वर्ध्याच्या साहित्य संमेलनाचे ते अध्यक्षही झाले असते. साहित्य परिषदेने त्यासाठीचे साहित्यकरण सुरुही केले होते पण नियतीने डाव उधळला. संतांचे विचार त्यांनी केवळ सांगितले नाहीत तर त्या विचारांशी सुसंगत असे त्यांचे सात्त्विक जगणे होते. त्यांच्या देवघरासमोर ज्ञानेश्वरीतली एक ओवी दररोज रांगोळीतून साकारत असे. घरातल्या मंडळीना नंतर ती मुखोद्रत होत असे. आचार, विचार आणि उच्चारातली एकवाक्यता जपत, विवेक आणि वैराग्य। हेचि जाणावे महत्माम्य ।। या संत विचाराशी जन्मभर प्रामाणिक राहून सत्त्वशील जगण्याचा आदर्श वस्तुपाठ निर्माण करणाऱ्या या राजहंसाचे आकस्मिक जाणे म्हणूनच दुःखदायक आहे.