अक्कलकोटमध्ये ऊसाचे बिल न मिळाल्याने तरुण शेतकऱ्याची आत्महत्या; खिशात सापडली चिठ्ठी

अक्कलकोट (सोलापूर) – ऊसाचे बिल न मिळाल्यामुळे आणि बँकेच्या कर्जफेडीच्या तगाद्यामुळे नैराश्येत गेलेल्या २८ वर्षीय तरुण शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केली आहे. मृत शेतकऱ्याचे नाव सुनील कुंभार असून ते अक्कलकोट तालुक्यातील रहिवासी होते. माहितीनुसार, सुनील यांनी दक्षिण सोलापूरातील धोत्री येथील गोकुळ साखर कारखान्यास मागील वर्षी ऊस पाठवला होता. नऊ महिने उलटूनही दीड लाख रुपयांचे बिल मिळाले नव्हते. त्याचवेळी बँक ऑफ महाराष्ट्र, मैदर्गी शाखेकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी सतत तगादा सुरू होता. २ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजता शेतातील वस्तीवर त्यांनी विष प्राशन केले. तत्काळ सोलापूरच्या सिव्हिल रुग्णालयात दाखल करून उपचार करण्यात आले, मात्र ८ दिवसांच्या उपचारांनंतर ११ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता त्यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर त्यांच्या खिशात एक चिठ्ठी सापडली असून त्यात कारखान्याकडून ऊसाचे बिल न मिळणे आणि बँकेच्या कर्जफेडीच्या तगाद्याचा उल्लेख आहे. सुनील अविवाहित होते. त्यांचा भाऊ यापूर्वीच मरण पावला असून त्यांच्या पश्चात वडील, आई आणि दोन विवाहित बहिणी आहेत.