विरार इमारत दुर्घटना : १४ मृत, बचावकार्य सुरू

विरारमधील रमाबाई अपार्टमेंट इमारत दुर्घटनेत मृतांचा आकडा वाढत असून आतापर्यंत १४ जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. घटनेतून २४ जणांना ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आले असून बचावकार्य अद्याप सुरू आहे. विजय नगरमधील नारंगी रोडवरील रमाबाई अपार्टमेंटच्या चार मजली इमारतीचा मागील भाग मंगळवारी मध्यरात्री कोसळला. इमारतीचा ढिगारा शेजारील चाळीवर कोसळल्याने मोठी जीवितहानी झाली. अपार्टमेंटमधील ५० घरांपैकी १२ घरं उद्ध्वस्त झाली आहेत. घटनास्थळी एनडीआरएफच्या ५ व्या बटालियनच्या दोन तुकड्या, वसई-विरार महानगरपालिकेचे कर्मचारी आणि स्थानिक पोलीस युद्धपातळीवर बचावकार्य करत आहेत. जवळपास ३० तासांपासून मदत व बचाव मोहीम अखंड सुरू आहे. मृतांमध्ये आरोही जोविल (२४), उत्कर्षा जोविल (१), लक्ष्मण किसकू सिंग (२६), दिनेश सकपाळ (४३), सुप्रिया नेवाळकर (३८), पार्वती सकपाळ (६०), दीपेश सोनी (४१), सचिन नेवाळकर (४०), हरीश सिंग बिष्ट (३४), सोनाली तेजाम (४१), कशिश पवन सहेनी (३५), शुभांगी पवन सहेनी (४०), गोविंद सिंग रावत (२८), दीपक सिंग बोहरा (२५) यांचा समावेश आहे. या दुर्घटनेनंतर शेजारच्या चार मजली इमारती आणि चाळी रिकाम्या करून रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. दरम्यान, या प्रकरणी विरार पोलिसांनी बांधकाम व्यावसायिक नितल गोपीनाथ साने आणि जमीनमालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना कायद्याच्या कलम ५२, ५३, ५४ तसेच भारतीय दंड संहितेच्या कलम १०५ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.