विजयपूरातील वृक्षेथाॅनला सांस्कृतिक स्पर्श
विजयपूर :- पर्यावरण
संरक्षण आणि ऐतिहासिक स्मारकांच्या जतनाच्या उद्देशाने 7 डिसेंबर रोजी होणाऱ्या
वृक्षेथॉनला यावर्षी सांस्कृतिक स्पर्श देण्यात आला आहे. धावण्याच्या मार्गावरील
निवडक ठिकाणी भारतीय कला-संस्कृतीची भव्यता उलगडण्यासाठी विशेष व्यासपीठे
उभारण्यात येत असून, त्या ठिकाणी विविध कलापथकांनी आपली कला
सादर करणार आहेत.या संदर्भात माहिती देताना वृक्षेथॉन ट्रस्टचे संचालक डॉ. महांतेश
बिरादार म्हणाले की, सलग सहाव्यांदा विजयपूर जिल्ह्यात
वृक्षेथॉनचे आयोजन होत असून यावर्षी 20 हजारांहून अधिक स्पर्धकांनी सहभागी
होण्यासाठी नोंदणी केली आहे. एखाद्या उद्देशासाठी धावण्यात सहभागी होऊन नवा विक्रम
प्रस्थापित करण्यासाठी विजयपूरकर सज्ज झाले आहेत. त्यामुळे यंदा धावण्याला
सांस्कृतिक स्पर्श देण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले.
डॉ. बी. आर. आंबेडकर परिसरात पुण्याचे ऑस्टिन यांच्या
टीमकडून झुंबा डान्स होणार आहे. धावण्याच्या प्रारंभीच्या ठिकाणी उद्योजक अनिल
धारवाडकर आणि श्रीकांत मंत्री यांच्या वतीने विशेष मंच उभारण्यात येत असून तिथे
कलाकार काहळे वादन तसेच करडी माजलू सादर करणार आहेत. कनकदास सर्कल येथे कन्नड व
संस्कृती विभागाच्या वतीने 14 कलाकार मोठ्या बाहुल्यांचे नृत्य सादर करणार असून
त्यामुळे धावण्याला विशेष मिरवणुकीची शोभा मिळणार आहे. आसार महलसमोर अक्कमहादेवी
महिला विद्यापीठाच्या 40 विद्यार्थिनींकडून बँड वादनमुळे धावपटूंना प्रोत्साहन
मिळणार आहे. दरबार हायस्कूल मैदानासमोर सनी गवीमठ यांच्या विशेष मंचावर युवतींकडून
चिअर-अप नृत्य सादर होणार आहे, अशी माहिती डॉ. बिरादार यांनी दिली.
देशभक्तीची गूंज :
कला-संस्कृतीचे अनावरण याशिवाय गोलगुंबज रोडवर शोभा नर्सिंग होमचे डॉ. शंकरगौड
पाटील यांच्या वतीने 10 जणांच्या पथकाकडून ताशा वादन होणार आहे. माजी उपमहापौर
दिनेश हळी यांच्या वतीने केरळमधील 35 महिला कलाकारांकडून फ्लॉवर डान्स, मायलारलिंगेश्वर कोरव नृत्य व श्रृंगार नृत्य सादर होणार आहे. बसवेश्वर
सर्कल येथे अरुण हुंडेकर यांच्या स्पूर्ती फाउण्डेशनतर्फे खानापूर एस. के. श्री
हेब्बळम्मा बाहुला नृत्यपथक व कोन्नूरच्या रायक्का महिला ढोल पथकाचे सादरीकरण
विशेष आकर्षण ठरणार आहे. गांधी सर्कल येथे डॉ. प्रभुगौड पाटील यांच्या अनुग्रह
हॉस्पिटलतर्फे शिरसीच्या स्मार्ट डान्स अकॅडमीच्या 10 कलाकारांकडून चिअर-अप डान्स
तसेच सैनिकी शाळेच्या विद्यार्थ्यांकडून देशभक्तीपर गीत सादर होणार आहे. शिवाजी
सर्कल येथे पालिकेच्या श्रीरामनवमी उत्सव समितीतर्फे हलगी वादनाचे सादरीकरण होणार
असून इतर अनेक ठिकाणीही विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जाणार आहेत, असे त्यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेत प्रा. मुरुगेश पटनशेट्टी, उपाध्यक्ष शिवणगौड पाटील, सदस्य सोमु मठ, अमित बिरादार, विनय कंच्याणी, नविद
नागठाण इतर उपस्थित होते.