विजयपूर बंद पूर्णपणे यशस्वी दुकाने आणि बाजारपेठा बंद, बस सेवा पूर्णपणे ठप्प, टायर पेटवून तीव्र निषेध

विजयपूर:

सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश बी. आर. गवई यांच्यावर चप्पल फेकण्याच्या घटनेतील आरोपीला अटक करण्याच्या मागणीसाठी विविध दलित, प्रगतिशील आणि अल्पसंख्याक संघटनांनी गुरुवारी दिलेल्या विजयपूर बंदच्या हाकेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून बंद पूर्णतः यशस्वी ठरला आहे. विजयपूर शहरातील बहुतांश दुकाने आणि बाजारपेठा पूर्णतः बंद होत्या. पेट्रोल पंप, औषधे, रुग्णालये आणि बँक व्यवहार वगळता सर्वच सेवा ठप्प होत्या. लाल बहादूर शास्त्री मार्केट कॉम्प्लेक्स, के.सी. मार्केट, श्री सिद्धेश्वर मंदिर, किराणा बाजार, भाजी मार्केट या सर्व ठिकाणी बंद प्रभावी होता.

बस सेवा ठप्प – जनजीवन विस्कळीत:*

बंदचा पार्श्वभूमीवर  शहरातीलच नव्हे तर ग्रामीण भागातील सार्वजनिक वाहतूक सेवा पूर्णपणे बंद होती. एसटी बसेस रस्त्यावर उतरल्याच नाहीत. ऑटो रिक्षांची संख्याही फारच कमी होती. सहसा गर्दीने फुलून असलेले सेंट्रल बस स्टँड, के.सी. मार्केट, गांधी चौक अशा अनेक भागांमध्ये शुकशुकाट होता. सकाळपासूनच प्रदर्शनकर्ते विविध ठिकाणी एकवटताना दिसून आले.

*प्रदर्शन तीव्र – टायर पेटवले:*

मुख्य न्यायाधीश बी. आर. गवई यांच्यावर चप्पल फेकल्याच्या घटनेचा तीव्र निषेध नोंदवत मोठ्या प्रमाणावर लोकांनी श्री सिद्धेश्वर मंदिरासमोर जमाव केला. इटगी पेट्रोल पंपजवळ अथणी रोडवर टायर पेटवून रोष व्यक्त करण्यात आला. हजारोंच्या संख्येने युवकांनी संघटितपणे आंदोलन स्थळी या घटनेचा तीव्र निषेध केला. तेथून निघालेल्या निषेध रॅली दरम्यान घोषणाबाजी करीत गांधी चौक, बसवेश्वर चौक यांसारख्या महत्त्वाच्या मार्गांवरून रॅली मार्गक्रमण करत डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात पोहोचली. तिथे निषेध सभेचे आयोजन करण्यात आले.  मोठ्या व्यासपीठावर विविध संघटनांच्या नेत्यांनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला. त्याचवेळी अनेक युवकांनी मंत्री प्रियांक खर्गे यांच्या समर्थनार्थ ‘We Stand With Priyank Kharge अशा मजकुराचे फलक  दाखवले.