जालन्यात डीवायएसपींचा ‘फिल्मी स्टाईल’ लाथेचा व्हिडीओ व्हायरल; संतापाची लाट

जालना : स्वातंत्र्यदिनानिमित्त पालकमंत्री पंकजा मुंडे जालना दौऱ्यावर
असताना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या उपोषणकर्त्यांनी त्यांना
भेटण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्यांना अडवलं. याच दरम्यान पोलिस
उपाधीक्षक (DYSP) अनंत कुलकर्णी यांनी आंदोलक अमित चौधरी यांच्या
कमरेत मागून ‘फिल्मी स्टाईल’ लाथ मारल्याचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. व्हिडीओत
पोलिसांनी आंदोलकांसोबत असलेल्या एका चिमुकल्या मुलालाही हाताला धरून घेऊन जात
असल्याचे स्पष्ट दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिस
प्रशासनावर संतापाची लाट उसळली आहे. अमित चौधरी आणि गोपाल रमेश चौधरी हे गेल्या
महिनाभरापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करत आहेत. त्यांचा आरोप आहे की,
कौटुंबिक वादातून दाखल केलेल्या प्रकरणात पोलिस आरोपींना पाठिशी
घालत आहेत आणि फिर्यादींना त्रास देत आहेत. स्वातंत्र्यदिनी पालकमंत्रींना आपली
कैफियत मांडण्याचा त्यांचा प्रयत्न होता. मात्र पोलिसांनी ते रोखले आणि त्यावेळी
हा धक्कादायक प्रकार घडला. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओतून
नागरिकांनी पोलिस प्रशासनाच्या वर्तनावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. DYSP
कुलकर्णी यांच्यावर कठोर कारवाईची मागणी होत असून, या घटनेमुळे पोलिस प्रशासनाच्या कार्यशैलीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण
झाले आहे.