खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे... गीताने भाऊंना अखेरचा निरोप पन्नालाल सुराणा यांचा देह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे सुपूर्द
सोलापूर दि. - राष्ट्रसेवा दलाच्या खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे... या साने गुरुजींच्या गीताने ज्येष्ठ समाजवादी विचारवंत पन्नालाल सुराणा यांना अखेरचा निरोप देण्यात आला. कार्यकर्त्यांमध्ये भाऊ म्हणून परिचित असलेले पन्नालाल सुराणा यांनी आपले संपूर्ण जीवन समाजातील शेतकरी ,कष्टकरी व उपेक्षित वर्गासाठी वाहून घेतले होते. अशा थोर नेत्याचे मंगळवारी रात्री प्राणज्योत मालविली. त्यांच्या संकल्पानुसार येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात बुधवारी दुपारी १ वाजता देहदानाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. तत्पूर्वी पन्नालाल सुराणा यांच्या पार्थिव देहाचे कुटुंबीय, नातेवाईक,कार्यकर्ते व नागरिकांनी दर्शन घेऊन श्रद्धांजली वाहिली. यावेळी पन्नालाल सुराणा यांचे पुत्र प्रभास, कन्या आरती आणि रोहित निरजा, तन्मय, मंजिरी आदी नातवंडे उपस्थित होते. यावेळी श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी, श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पुष्पराज काडादी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अंत्यदर्शन घेतले. महात्मा गांधी, साने गुरुजी,राम मनोहर लोहिया यांच्या विचारानुसार पन्नालाल सुराणा यांनी आपले संपूर्ण जीवन समाजातील उपेक्षित वर्गासाठी वाहून घेतले होते.शेतकरी,कष्टकऱ्यांसाठी चळवळ उभी करून त्यांच्यासाठी प्रसंगी तुरुंगवासही भोगला. कर्मयोगी आप्पासाहेब काडादी, रंगाअण्णा वैद्य यांच्याबरोबर त्यांचे सलोख्याचे संबंध होते अशा शब्दात धर्मराज काडादी यांनी यावेळी श्रद्धांजली वाहिली. ज्येष्ठ पर्यावरण तज्ञ अतुल देऊळगावकर यांनी भाऊ एक चालता-बोलता विद्यापीठ होते. शेवटच्या क्षणापर्यंत समाजसेवेबरोबरच वाचनाचा व्यासंग केला. त्यांनी कार्यकर्त्यांबरोबरच पत्रकार ,लेखकही घडविल्याचे सांगितले. किल्लारी भूकंपानंतर अनाथ झालेल्या मुलांसाठी 'आपलं घर'च्या माध्यमातून शेकडो विद्यार्थ्यांना घडविणारे पन्नालाल सुराणा यांच्या जाण्याने वंचितांचे पालकत्व हरवल्याची भावना प्रा. श्रीकांत धारूरकर यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ
.ऋत्विक जयकर यांनीही ज्येष्ठ समाजवादी विचारवंत पन्नालाल सुराणा यांना
श्रद्धांजली अर्पण केले. त्यानंतर सुराणा
कुटुंबीयांच्या उपस्थितीत वैद्यकीय महाविद्यालयातील शरीररचना शास्त्र विभागाकडे
त्यांचा देह सुपूर्द करण्यात आला. यावेळी त्यांच्या कुटुंबीयांसह कार्यकर्त्यांचा
शोक अनावर झाला होता. यावेळी ॲड. सयाजी शिंदे, प्रकाश शहा, शंकर
झुलपे, नवनाथ गेंड, गुंडू पवार,
बालाजी फडे, विलास वकील, बी.टी .खुणे, दत्ता गायकवाड , दत्ता
थोरे , बाबुराव मैंदर्गीकर यांच्यासह भाऊंनी घडवलेले
राष्ट्रसेवा दलाचे कार्यकर्ते, नळदुर्ग येथील 'आपलं घर' मधील माजी विद्यार्थी, कुर्डूवाडी येथील आंतरभारती विद्यालयाचे सर्व शिक्षक उपस्थित होते.
'आपलं घर' येथे आज
शोकसभा राष्ट्रसेवा दलाचे सर्वाधिक काळ
अध्यक्ष राहिलेले ज्येष्ठ समाजवादी विचारवंत पन्नालाल सुराणा यांच्या निधनाबद्दल
उद्या (गुरुवारी) सकाळी 11 वाजता नळदुर्ग येथील 'आपलं घर'
या संस्थेत शोकसभेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती राष्ट्रसेवा
दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित शिंदे यांनी सांगितले.