ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज; प्रकृती स्थिर

ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची तब्येत बिघडल्याने त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या प्रकृतीबाबत सोशल मीडियावर अनेक अफवा पसरल्या होत्या, मात्र आता त्यांची प्रकृती सुधारली असून त्यांना आज सकाळी ७:३० वाजता डिस्चार्ज देण्यात आला आहे. रुग्णालयाचे डॉक्टर प्रतीत समाधानी यांनी सांगितले की, “धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून, पुढील उपचार घरीच केले जातील.” त्यांच्यासोबत मुलगा बॉबी देओल उपस्थित होता. दरम्यान, सनी देओलच्या टीमने अधिकृत निवेदन जारी करत सांगितले की, “धर्मेंद्र यांना डिस्चार्ज मिळाला आहे. माध्यमांनी कोणतेही अंदाज लावू नयेत, तसेच कुटुंबाला या काळात प्रायव्हसी द्यावी.” धर्मेंद्र यांच्या चाहत्यांना त्यांनी आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करण्याचं आवाहन केलं आहे. अलीकडेच सोशल मीडियावर धर्मेंद्र यांच्या निधनाच्या अफवा पसरल्या होत्या. मात्र त्यांच्या मुलगी ईशा देओल आणि पत्नी हेमा मालिनी यांनी त्या सर्व अफवांचं खंडन केलं.