पलवलमध्ये दोन युट्यूबर पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याच्या आरोपाखाली अटक — पाक उच्चायोगाशी लाचवहन्याचा गंभीर आरोप

चंदीगड : हरियाणाच्या पलवल पोलिसांनी दोन युट्यूबर्सना
पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. अटक करण्यात
आलेल्या दोघांची नावे वसीम अकरम आणि तौफीक अशी आहेत. हे दोघेही पाकिस्तानी
उच्चायोगासोबत मिळून हेरगिरीचं नेटवर्क चालवत असल्याचं तपासात समोर आलं आहे. पोलिसांच्या
माहितीनुसार, वसीम आणि तौफीक हे लोकांकडून पैसे घेऊन
त्यांना पाकिस्तानी व्हिसा मिळवून देण्याचं आश्वासन देत होते. त्यांनी कमावलेले
पैसे पाकिस्तानी उच्चायोगातील अधिकाऱ्यांना पोहोचवले जात होते. दानिश नावाचा
कर्मचारी हे पैसे आयएसआय एजंटपर्यंत पोहोचवत होता. हे एजंट टुरिस्ट व्हिसावर
भारतात येऊन इथे राहून हेरगिरीचं काम करत होते. वसीम अकरमने सिव्हिल इंजिनिअरींगचं
शिक्षण पूर्ण केलं आहे. त्याला व्हिसा मिळवताना पहिल्यांदा या जाळ्यात अडकवण्यात
आलं. त्याचा व्हिसा रद्द झाल्यानंतर त्याने पाकिस्तानी हाय कमिशनमधील जाफर उर्फ
मुजम्मिल हुसैन याला २० हजार रुपये लाच देऊन व्हिसा मिळवला. मे २०२२ मध्ये तो
पाकिस्तानच्या कसूरला गेला होता. परतल्यानंतर तो जाफरसोबत व्हॉट्सअॅपवर संपर्कात
होता आणि व्हिसाच्या नावाखाली लोकांकडून पैसे घेण्याचं काम सुरू केलं. त्याच्या
खात्यात सुमारे ४ ते ५ लाख रुपये जमा झाले होते. त्यातील मोठा हिस्सा जाफर आणि इतर
पाकिस्तानी अधिकाऱ्यांना दिला जात होता. तसेच वसीम आणि तौफीक पाक एजंटला सिमकार्ड,
ओटीपी आणि भारतीय सैन्याशी संबंधित संवेदनशील माहिती पुरवत होते. पंजाब
आणि हरियाणात मोठमोठ्या लष्करी छावण्या आणि एअरफोर्स स्टेशन असल्याने पाकिस्तान या
परिसरातील लोकांना व्हिसा आणि पैशाचं आमिष दाखवून हेरगिरीस प्रवृत्त करत असल्याचं
तपासात दिसून आलं आहे. या प्रकरणानंतर भारताने पाकिस्तानी उच्चायोगातील जाफर आणि
दानिश या दोघांना भारत सोडण्याचे आदेश दिले आहेत. या अटकेमुळे पाकिस्तानी उच्चायोग
केवळ व्हिसा देण्याचं काम करत नाही, तर भारतात राहून
हेरगिरीचं नेटवर्क उभं करण्यामागेही त्यांचा हात असल्याचं स्पष्ट झालं आहे.