गॅसचे बटण चालू राहिल्याने गुदमरुन दोघा बालकांचा मृत्यू

सोलापूर, दि. १- सदर बझार भागातील बेडरपूल येथे रात्रीच्यावेळी गॅसचे बटण चालू राहिल्याने गॅस गळती होऊन गुदमरुन दोघा बालकांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत असून कुटुंबातील अन्य तिघांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हर्ष राज बलरामवाले (वय ६) व अक्षरा राज बलरामवाले (वय ४, दोघे रा. बेडरपूल, लष्कर) अशी मरण पावलेल्या दोघांची नावे आहेत. तर विमल मोहनसिंग बलरामवाले (वय ६०), रंजनाबाई युवराज बलरामवाले (वय ३५) व युवराज मोहनसिंग बलरामवाले (वय ४०, सर्व रा. बेडरपूल, लष्कर) या तिघांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हे सर्व पाचजण एकाच कुटुंबातील असून ते सर्वजण लष्कर भागात राहतात. युवराज हे गवंडीचे काम करतात. ते तिरुपती बालाजी येथे जाऊन शनिवारी सायंकाळी परतले होते. त्यानंतर घरातील सर्वजण जेवण करून रात्री झोपले. रविवारी सकाळी बलरामवाले यांचे घर अजून कसे उघडले नाही म्हणून गल्लीतील लोकांनी चौकशी केली. त्यानंतर त्यांच्या नातेवाइकांनी घराचा वरील बाजूचा पत्रा उचकटून आत पाहिले. असता सर्वजण बेशुध्दावस्थेत व तोंडाला फेस आलेल्या अवस्थेत आढळून आले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर सदर बझार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सर्वांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचार चालू असताना हर्ष व अक्षरा या दोन बहीण-भावाचा मृत्यू झाला. या घटनेचा अधिक तपास पोलिसांकडून सुरू आहे. या सर्वांच्या तोंडाला फेस कशामुळे आला? त्यांना कशाची विषबाधा झाली का? याचीही चौकशी करण्यात येत आहे.