कराडजवळ भीषण अपघात : विद्यार्थ्यांची बस २० फूट खड्ड्यात कोसळली, अनेक जखमी
कराड:- कराडजवळून एक गंभीर अपघाताची बातमी समोर आली आहे.
नाशिकमधील कॉलेजच्या विद्यार्थ्यांची बस २० फूट खोल खड्ड्यात कोसळल्याने एकच खळबळ
उडाली. या बसमध्ये ४० ते ४५ विद्यार्थी प्रवास करत होते. अपघातात अनेक विद्यार्थी
जखमी झाले असून पाच जणांची प्रकृती गंभीर आहे. सर्व जखमी विद्यार्थ्यांना तातडीने
कृष्णा हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे. पुणे–बंगळुर महामार्गाचे रुंदीकरणाचे काम
सातत्याने सुरू असून सातारा–कराडदरम्यान अनेक ठिकाणी वळणे, बॅरिगेट्स आणि रस्त्यालगत मोठ्या प्रमाणात खुदाईचे काम चालू आहे. या
असुरक्षित परिस्थितीमुळे दररोज अपघातांचे प्रमाण वाढले आहे. आजच्या घटनेतही
चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून बस काम चालू असलेल्या पुलाजवळील मोठ्या खड्ड्यात
जाऊन कोसळली. नाशिकमधून ४० ते ५० विद्यार्थी सहलीसाठी निघाले होते. अपघातानंतर
ताबडतोब बचावकार्य सुरू करण्यात आले. गंभीर अवस्थेतील पाच विद्यार्थ्यांवर विशेष
उपचार सुरू असून उर्वरित विद्यार्थी किरकोळ जखमी आहेत. सुदैवाने या अपघातात
कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या परिसरात सुरू असलेल्या रस्ते कामांमुळे वारंवार
होणाऱ्या अपघातांबाबत स्थानिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. प्रशासनाने
तत्काळ सुरक्षा उपाययोजना वाढवण्याची मागणी सुरू झाली आहे.