सहारनपूरमध्ये भीषण अपघात; डंपर कारवर उलटला, एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू
उत्तर प्रदेशातील सहारनपूरच्या गगलहेरी पोलीस स्टेशन
परिसरात शुक्रवारी सकाळी एक भीषण अपघात घडला. भरधाव वेगातील डंपर अचानक नियंत्रण
सुटल्याने समोरून येणाऱ्या कारवर उलटला आणि या भयंकर दुर्घटनेत एकाच कुटुंबातील
सात जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये एका लहान मुलाचाही समावेश असल्याची
माहिती मिळाली आहे.
सय्यद माजरा येथील हे कुटुंब गंगोह येथे एका
नातेवाईकाच्या अंत्यसंस्कारासाठी जात होते. नातेवाईकाच्या निधनाने आधीच दुःखाचा
डोंगर कोसळलेला असताना, वाटेतच या भीषण अपघातात संपूर्ण कुटुंब
उद्ध्वस्त झाले. अपघात इतका भयानक होता की कार पूर्णपणे डंपरखाली चिरडली.
प्रवाशांना बाहेर काढणे अत्यंत कठीण झाले. घटनेची माहिती मिळताच आसपासच्या
गावांमधील लोक मोठ्या संख्येने घटनास्थळी धावले. रस्त्यावर गोंधळाचे वातावरण
निर्माण झाले आणि वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली. सीओ सदर, गगलहेरी
पोलिस स्टेशनचे एसएचओ तसेच वाहतूक निरीक्षक मोठ्या पोलिस तुकडीसह घटनास्थळी
पोहोचले. पोलिसांनी तातडीने बचावकार्य सुरू केले. कार आणि डंपर वेगळे करण्यासाठी JCB
आणि क्रेनचा वापर करण्यात येत आहे. कारमध्ये अडकलेल्या सर्व
मृतदेहांना बाहेर काढण्यात पोलिस व अग्निशमन पथकाला मोठा ताण सहन करावा लागत आहे.
दरम्यान, ग्रामस्थांमध्ये तीव्र रोष निर्माण झाला
आहे. ते घटनास्थळी वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलवण्याचा आग्रह धरत आहेत आणि घोषणाबाजी
करत आहेत. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले आहेत. या
भीषण अपघातानंतर संपूर्ण परिसरात आणि मृतांच्या गावात शोककळा पसरली आहे. एकाच
कुटुंबातील सात सदस्यांचा मृत्यू ही हृदयविदारक घटना म्हणून पाहिली जात आहे.