पैशासाठी छळ, चाबकाने मारहाण – कंटाळून तरुणीची आत्महत्या; पतीसह तिघांविरोधात गुन्हा दाखल

सोलापूर :- माढा
तालुक्यातील दहिवली गावात एका विवाहितेने सततच्या छळास कंटाळून आत्महत्या केल्याची
धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
काजल मिस्कीन नारायण मिस्कीन (वय २५) असे मृत विवाहितेचे नाव आहे. माहितीनुसार,
काजलवर पती नारायण विलास मिस्कीन, सासरे विलास
रामचंद्र मिस्कीन व सासू शोभा विलास मिस्कीन यांनी सात लाख रुपये माहेरून
आणण्यासाठी दबाव टाकला. यातच तिला चाबकाने मारहाण, उपाशी
ठेवणे, कोणाशीही बोलू न देणे असा छळ केला जात होता. गुरुवारी
सकाळी सात वाजता काजलने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबतची माहिती
मिळताच टेंभुर्णी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह आरोग्य केंद्रात नेण्यात आला
असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यानंतर शवविच्छेदनासाठी सोलापूर सिव्हिल
रुग्णालयात पाठविण्यात आले. या प्रकरणी टेंभुर्णी पोलिस ठाण्यात पती व सासरच्या
दोघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात
घेण्यात आले आहे.
पूर्वेतिहास काजलचा विवाह ११ जुलै २०१९ रोजी झाला होता. सासरी छळ होत असल्याने तिने यापूर्वी कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला होता. जवळपास वर्षभर ती माहेरी राहिली होती. मात्र, पतीने कोर्टात चांगले नांदवण्याची लिखित हमी दिल्यानंतर जून २०२४ मध्ये ती पुन्हा सासरी गेली होती. त्यानंतरही छळ सुरूच होता, असा आरोप नातेवाईकांनी केला. कुटुंबीयांचा आरोप काजलच्या शरीरावर मारहाणीचे व्रण असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. तिला गार पाण्यानेच अंघोळ करण्यास भाग पाडले जात होते, नातेवाईकांशी बोलू दिले जात नव्हते. रक्षाबंधनालाही माहेरी पाठवले गेले नाही, असा आरोपही कुटुंबीयांनी केला. मृत काजलच्या पश्चात चार वर्षांची मुलगी आहे.