ताम्हिणी घाटात थार ५०० फूट दरीत कोसळली; सहा जणांचा मृत्यू, ड्रोनच्या सहाय्याने शोधमोहीम

मानगाव महामार्गावरील ताम्हिणी घाटात भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. थार गाडी तब्बल ५०० फूट दरीत कोसळली असून या भीषण दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक पुष्टीकरण मिळाले आहे. पोलिस व आपत्कालीन पथकांनी घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम हाती घेतली असून ड्रोनच्या सहाय्याने दरीत सापडणाऱ्या मृतदेहांचा शोध सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ताम्हिणी घाटातील अतिशय अवघड आणि धोकादायक वळणावरून ही थार गाडी नियंत्रण सुटल्याने थेट खोल दरीत कोसळली. हा अपघात सोमवारी रात्रीच झाल्याची शक्यता व्यक्त केली जाते. परंतु दरीतील दूरवरच्या ठिकाणी वाहन पडल्याने घटना उशिरा उघडकीस आली. गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तरुणांचा शोध सुरू होता. त्यांच्या मोबाईलचे शेवटचे लोकेशन ताम्हिणी घाट परिसरात दिसत असल्याने पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली. त्यानंतर हा भीषण अपघात असल्याचे स्पष्ट झाले. अपघाताची माहिती तिन दिवसांनी समोर आल्यानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिस, स्थानिक प्रशासन आणि SDRF पथके मिळून शोधकार्य अखंड सुरू आहे.