ठाणे पडघा: दहशतवादी आर्थिक व्यवहार प्रकरणी ईडी–एटीएसची मध्यरात्री मोठी छापेमारी

महाराष्ट्र एटीएस आणि प्रवर्तन निदेशालयाने (ईडी) दहशतवादी कृत्याशी संबंधित आर्थिक व्यवहारांच्या तपासाचा भाग म्हणून ठाणे जिल्ह्यातील पडघा परिसरातील बोरीवली गावात मध्यरात्री व्यापक छापेमारी केली. या धाडीत अनेक घरांची एकाचवेळी झडती घेतली गेली असून, तपास पथकांनी रात्रीभर शोधमोहीम सुरू ठेवली. प्राथमिक माहितीनुसार, गावात तरुणांना दहशतवादी प्रशिक्षण दिले जात असल्याची गोपनीय माहिती तपास यंत्रणांना मिळाली होती. याच पार्श्वभूमीवर ईडी–एटीएसने संयुक्त कारवाई केली. या कारवाईत अनेक महत्त्वाची कागदपत्रे, डिजिटल गॅझेट्स आणि संशयित इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त झाल्याची माहिती समोर आली आहे. कारवाईनंतर बोरीवली गावात वातावरण तणावपूर्ण झाले असून, पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

साकीब नाचन कनेक्शन

अलिकडेच अटक झालेल्या साकीब नाचनच्या तपासातून बोरीवली गावातील स्लीपर सेल संबंधी महत्त्वाची माहिती मिळाली होती. साकीब हा या गावाचा रहिवासी असून, तरुणांना भडकवणे, स्लीपर सेल उभे करणे आणि त्यांना प्रशिक्षण देण्यात तो तरबेज असल्याचे तपासात उघड झाले. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर बोरीवलीत काही संशयास्पद हालचाली सुरू असल्याची गोपनीय माहिती एटीएसला मिळाल्याने ही कारवाई करण्यात आली.

२००३च्या बॉम्बस्फोटानंतर गाव प्रकाशझोतात

२००३ मध्ये मुलुंड आणि घाटकोपर रेल्वे स्थानकांवरील बॉम्बस्फोटानंतर बोरीवली गाव प्रथमच प्रकाशझोतात आले. या हल्ल्याचा मास्टरमाइंड म्हणून साकीब नाचण आणि त्याच्या साथीदारांना अटक करण्यात आली होती. भिवंडीजवळील पडघ्यातील बोरीवली गावात साकीबने स्वतःचे वेगळे "देश" तयार केल्याचा धक्कादायक प्रकारही समोर आला होता. त्याने या भागाला अल शाम’ नाव देऊन स्वतःचे मंत्रीमंडळ आणि स्वतंत्र राज्यघटना तयार केली होती. या पार्श्वभूमीवर, सध्या सुरू असलेल्या ईडी आणि एटीएसच्या संयुक्त धाडी विशेष महत्त्वाच्या ठरत आहेत.