बेस्ट पतपेढी निवडणुकीत ठाकरे बंधूंचा पराभव; राज ठाकरे म्हणाले – “हा विषय मला माहितीच नाही”

मुंबई :- बेस्ट पतपेढीच्या 2025 निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून ठाकरे बंधूंच्या युतीला मोठा धक्का बसला आहे. उद्धव ठाकरे गट आणि मनसेच्या उत्कर्ष पॅनलचा दारूण पराभव झाला. २१ जागांपैकी कामगार नेते शशांक राव यांच्या पॅनलने १४ जागांवर विजय मिळवला, तर भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या सहकार समृद्धी पॅनलला ७ जागा मिळाल्या. निकालानंतर राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या. ठाकरे बंधूंच्या युतीनंतर हा पराभव महत्त्वाचा मानला जातो. दुसऱ्याच दिवशी सकाळी ९ वाजता राज ठाकरे यांनी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. जवळपास पाऊण तास दोघांमध्ये चर्चा झाली. पत्रकार परिषदेत निकालावर भाष्य करताना राज ठाकरे म्हणाले, “ही स्थानिक पतपेढी निवडणूक आहे. छोट्या गोष्टी आहेत. पण तुम्हाला २४ तास काहीतरी दाखवायला लागतं.” मात्र शहरातील वाढत्या झोपड्या, पार्किंगची समस्या आणि ‘अर्बन नक्षल’पेक्षा शहरातील शिस्त प्रस्थापित करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. या निकालामुळे आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणांबद्दल नव्या चर्चा सुरू झाल्या आहेत.