पाकिस्तानात दहशत! पेशावरमधील एफसी मुख्यालयावर बंदूकधारींचा हल्ला; तीन दहशतवादी ठार

पाकिस्तानातील पेशावर येथे आज सकाळी मोठा दहशतवादी हल्ला झाला आहे. फेडरल कॉन्स्टेब्युलरी (एफसी) मुख्यालयावर बंदूकधारींनी अचानक हल्ला चढवला, अशी माहिती स्थानिक माध्यमांनी दिली. हल्ल्यादरम्यान दोन शक्तिशाली स्फोट आणि सतत गोळीबार झाल्याने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. सोमवार सकाळी ८:१० वाजता हा हल्ला झाला. स्फोटांचा मोठा आवाज ऐकू येताच पोलिस आणि सुरक्षा दलांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत सुनहेरी मस्जिद रोड बंद करून संपूर्ण परिसराला वेढा घातला. अनेक रहिवाशांनी सोशल मीडियावर पोस्ट करत, “एफसी मुख्यालयातून बॉम्बस्फोटासारखा मोठा आवाज ऐकू आला,” असे सांगितले. सुरक्षा अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, मुख्यालयाच्या गेटवर एका आत्मघातकी हल्लेखोराने स्वतःला उडवून दिले, त्यानंतर इतर दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. हल्ल्यानंतर झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाल्याची पुष्टी सुरक्षा दलांनी केली आहे. ऑनलाइन व्हिडिओंमध्ये सातत्याने गोळीबाराचा आवाज आणि धूराचे लोट दिसत असून, हल्ल्याचे स्वरूप गंभीर असल्याचे स्पष्ट होत आहे. पोलिसांनी परिसरातील सर्व रस्ते बंद करून विस्तृत तपास सुरू केला आहे.

हल्ल्याच्या कारणांबाबत अद्याप अधिकृत माहिती नसली तरी, ही घटना पाकिस्तानातील वाढत्या दहशतवादी कारवायांच्या मालिकेतील आणखी एक गंभीर हल्ला मानला जात आहे.