राजस्थानच्या दौसा जिल्ह्यात भीषण अपघात; खाटू श्याम दर्शनावरून परतणाऱ्या ११ भाविकांचा मृत्यू

दौसा (राजस्थान) –
राजस्थानमधील दौसा जिल्ह्यातील बापी गावाजवळ बुधवारी पहाटे भीषण अपघात झाला. खाटू
श्याम आणि सालासर बालाजी मंदिराचे दर्शन घेऊन उत्तर प्रदेशातील एटा येथे परतणाऱ्या
भाविकांच्या पिकअप व्हॅनने सर्व्हिस लेनमध्ये उभ्या असलेल्या ट्रकला जोरदार धडक
दिली. या अपघातात ११ जणांचा मृत्यू झाला असून यात ७ मुले आणि ४ महिलांचा समावेश
आहे. याशिवाय ८ जण जखमी झाले असून त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. पिकअपमध्ये
एकूण २० प्रवासी होते. दौसाचे पोलिस अधीक्षक सागर राणा यांनी सांगितले की, अपघात पहाटे ४ ते ५ वाजण्याच्या सुमारास मनोहरपूर महामार्गावर झाला.
उपअधीक्षक रवी प्रकाश शर्मा यांनी मृत्यूची पुष्टी केली. उत्तर प्रदेशचे
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या अपघाताबद्दल दुःख व्यक्त करत मृतांच्या
कुटुंबियांप्रति संवेदना व्यक्त केल्या आणि जखमींच्या लवकर बरे होण्यासाठी
प्रार्थना केली. तसेच, राजस्थान सरकारशी समन्वय साधून
मदतकार्य करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.