भारतीय क्रिकेटपटू स्मृती मंधाना लवकरच लग्नबंधनात; बॉलिवूड संगीत दिग्दर्शक पलाश मुच्छलने दिला मोठा खुलासा

इंदूर : भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार आणि स्टार सलामीवीर स्मृती मंधाना लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याची मोठी बातमी समोर आली आहे. इंदूरमध्ये सुरू असलेल्या महिला वनडे विश्वचषक 2025 मधील भारत-इंग्लंड सामन्यापूर्वी बॉलिवूड संगीत दिग्दर्शक पलाश मुच्छल यानेच ही माहिती अधिकृतपणे दिली आहे. पलाश मुच्छल हा इंदूरचा रहिवासी असून त्याने सांगितले, “स्मृती लवकरच इंदूरची सून होणार आहे. मी एवढंच सांगेन — मी तुम्हाला हेडलाइन दिली आहे,” असे तो हसत म्हणाला. या खुलाशाने स्मृती मंधानाच्या चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. स्मृती आणि पलाशचे नाव काही महिन्यांपासून सोशल मीडियावर चर्चेत होते, परंतु या वक्तव्यानंतर त्यांच्या नात्याला अधिकृत स्वरूप मिळाले आहे. सध्या स्मृती मंधाना भारतीय महिला संघासोबत महिला विश्वचषकात व्यस्त आहे. कर्णधार हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारत उपांत्य फेरीसाठी झगडत आहे. स्मृतीने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात फॉर्मात परत येत जबरदस्त फलंदाजी केली होती.

पलाश मुच्छल हा प्रसिद्ध गायिका पलक मुच्छलचा भाऊ असून, त्याने ‘बडी हेरोईन ट्रेंडी है’, ‘तेरी मेरी कहानी’ यांसारख्या हिट गाण्यांसाठी संगीत दिले आहे. सध्या तो राजू बाजेवाला’ या चित्रपटाचे दिग्दर्शन करत असून, यात अविका गोर आणि चंदन रॉय प्रमुख भूमिकेत आहेत. स्मृती आणि पलाशच्या लग्नाबाबत अद्याप तारीख जाहीर करण्यात आलेली नसली तरी, इंदूरमध्येच लग्नसोहळा पार पडणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.