तपोवन वृक्षतोड वाद: अण्णा हजारेंची ठाम भूमिका – “मोठी झाडे तोडणे अयोग्य”
नाशिकमधील आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तपोवन
परिसरातील हजारो झाडे साधुग्राम उभारण्यासाठी तोडली जाणार असल्याचा आरोप
पर्यावरणप्रेमी करीत आहेत. या वृक्षतोडीविरोधात पर्यावरण कार्यकर्ते, स्थानिक नागरिक तसेच विविध राजकीय पक्षांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
अभिनेता सयाजी शिंदे यांनीही या प्रकरणावर कठोर भूमिका मांडली होती. या वादावर आता
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पहिली प्रतिक्रिया देत वृक्षतोडीला विरोध
दर्शविला आहे. अण्णा हजारे म्हणाले, “कुंभमेळा समाज आणि
राष्ट्रहितासाठी असला, तरी मोठी झाडे तोडणे अयोग्य आहे.
झाडांमुळे मानवासोबतच वन्यजीवांनाही जीवदान मिळते. वृक्षतोड म्हणजे राष्ट्राचे
नुकसान आहे. फारच गरज असेल तर केवळ छोटी झाडे तोडता येतील, पण
मोठी झाडे वाचवलीच पाहिजेत.” दरम्यान, तपोवनातील
साधुग्रामच्या जागेवर होणाऱ्या वृक्षतोडीचा वाद दिवसेंदिवस तीव्र होत आहे. ज्या
ठिकाणी साधुग्राम उभे राहणार आहे, त्या ठिकाणी
पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशिप (PPP) तत्वावर प्रदर्शन केंद्र,
बॅन्क्वेट हॉल आणि रेस्टॉरंट उभारण्याची मोठी योजना राबवली जात
असल्याचा आरोप आहे. महापालिकेने या प्रकल्पासाठी तब्बल 220 कोटी
रुपयांचे टेंडर काढले असून 33 वर्षांसाठी जागा खाजगी
विकासकाला देण्यात येणार असल्याचेही म्हटले जात आहे. पर्यावरणप्रेमी मात्र ठाम
आहेत—तपोवनातील हिरवाईची कत्तल थांबवली नाही तर मोठे आंदोलन उभे राहील.