लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थ्यांची दिवाळी गोड! सप्टेंबर महिन्याचा हप्ता १० ऑक्टोबरपासून जमा होणार
मुंबई, 10 ऑक्टोबर 2025 — राज्यातील
लाखो महिलांसाठी आनंदाची बातमी. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा सप्टेंबर
महिन्याचा ₹1500 हप्ता अखेर मिळणार आहे. महिला व बालविकास
मंत्री अदिती तटकरे यांनी जाहीर केले की, 10 ऑक्टोबरपासून
या हप्त्याचे वितरण सुरू होणार असून, पात्र लाभार्थ्यांच्या
आधार संलग्नित बँक खात्यांमध्ये थेट निधी जमा केला जाईल.
अतिवृष्टीमुळे राज्यात शेतकरी आणि नागरिक अडचणीत असताना, दिवाळीपूर्वी मिळणाऱ्या या रकमेने महिलांना दिलासा मिळणार आहे.
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ ही योजना महायुती सरकारची एक
महत्त्वाकांक्षी योजना असून, राज्यातील पात्र महिलांना दर
महिन्याला ₹1500 सन्मान निधी दिला जातो.
तटकरे म्हणाल्या, “महाराष्ट्रातील माता-भगिनींच्या
विश्वासामुळे ही सक्षमीकरणाची क्रांती अखंड सुरू आहे. मागील महिन्यापासून https://ladakibahin.maharashtra.gov.in
या संकेतस्थळावर E-KYC सुविधा उपलब्ध करून
देण्यात आली आहे. सर्व लाडक्या बहिणींनी पुढील दोन महिन्यांत ही प्रक्रिया पूर्ण
करावी.” या घोषणेनंतर महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, दिवाळीपूर्वी
आर्थिक आधार मिळाल्याने ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ प्रत्यक्षात गोड ठरणार आहे.