अमेरिकेच्या आयात कराला उत्तर! स्वदेशी जागरण मंचचा परदेशी वस्तूंवर बहिष्काराचा निर्धार

अमेरिकेने भारतावर ५० टक्के आयात कर लादल्याच्या निर्णयावर
प्रतिक्रिया देताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्न असलेल्या स्वदेशी जागरण
मंचने देशभरात स्वदेशी वस्तू वापरण्याचे आवाहन केले आहे. |
राष्ट्रीय सह-संयोजक अश्विनी महाजन यांनी सांगितले की, “अमेरिकेच्या या धोरणामुळे आपल्या १० कोटी दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांवर
परिणाम होऊ शकतो. आपल्याला स्वस्त परदेशी वस्तूंना थारा न देता आपल्या शेतकऱ्यांचे
संरक्षण करणे आवश्यक आहे.”
दूध आणि धर्म – भावनिक मुद्दा
महाजन म्हणाल्या, “अमेरिकेत गायींना मांसाहारी अन्न दिले
जाते, त्यामुळे तिथले दूधही मांसाहारी होते. आपण देवाला असे
दूध अर्पण करतो, यावर विचार व्हायला हवा.”
आत्मनिर्भर
भारतासाठी पुन्हा एकदा हाक
स्वदेशी जागरण मंचच्या मते, कोणताही देश परदेशी संसाधने व
तंत्रज्ञानाच्या आधारावर प्रगती करू शकत नाही. भारत आता संरक्षण, औषध, खेळणी, वीज क्षेत्रात
स्वावलंबी होत आहे. त्यामुळे लोकांनी अमेझॉन, फ्लिपकार्ट,
वॉलमार्टसारख्या परदेशी ई-कॉमर्स कंपन्यांपासून दूर राहणे गरजेचे
आहे.
स्वदेशी शपथ आणि रक्षाबंधन विशेष मोहिम
- प्रत्येक दुकानदार, व्यापारी आणि उद्योगपतींना स्वदेशी
वस्तूंचा स्वीकार आणि विक्री करण्याची शपथ देण्याचे अभियान सुरू
- रक्षाबंधनानिमित्त
स्वदेशी वस्तूंवर भर
- बाजारात आणि
दुकानांमध्ये "स्वदेशी वस्तू वापरा" अशी होर्डिंग्ज लावण्याची योजना