शेअर बाजाराची सकारात्मक सुरुवात; सेन्सेक्स-निफ्टी हिरव्या निशाणीवर

आठवड्यातील तिसऱ्या व्यवहार दिवशी भारतीय शेअर बाजाराने आज सकारात्मक सुरुवात केली. प्रमुख बेंचमार्क निर्देशांक बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी ५० हिरव्या रंगात उघडले. ३० शेअर्सचा बीएसई सेन्सेक्स निर्देशांक १७६.४० अंकांनी म्हणजेच ०.२१ टक्क्यांनी वाढून ८४,८५६.२६ वर उघडला. तर एनएसई निफ्टी ५० ४२.३० अंकांनी म्हणजेच ०.१६ टक्क्यांनी वाढून २५,९०२.४० वर पोहोचला. सकाळी ९:२० वाजेपर्यंत सेन्सेक्स १९ अंकांच्या किरकोळ वाढीसह ८४,६९९ वर व्यवहार करत होता, तर निफ्टी ५० १७ अंकांनी वाढून २५,८७७ वर ट्रेड करत होता. बीएसईमध्ये इटर्नल, अ‍ॅक्सिस बँक, मारुती सुझुकी आणि एसबीआयएन (SBI) हे शेअर्स सर्वाधिक वाढीसह व्यवहार करत होते. तर आयसीआयसीआय बँक, टायटन, ट्रेंट आणि एचडीएफसी बँक या शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळाली.

दरम्यान, मंगळवारी (१६ डिसेंबर) भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण झाली होती. सेन्सेक्स ५३३.५० अंकांनी किंवा ०.६३ टक्क्यांनी घसरून ८४,६७९.८६ वर बंद झाला होता. तर निफ्टी ५० १६७.२० अंकांनी किंवा ०.६४ टक्क्यांनी घसरून २५,८६०.१० वर बंद झाला होता.

मंगळवारी बीएसईमध्ये टायटन, भारती एअरटेल, महिंद्रा अँड महिंद्रा, एशियन पेंट्स आणि टेक महिंद्रा हे शेअर्स वाढीसह बंद झाले होते. तर अ‍ॅक्सिस बँक, इटर्नल, टाटा स्टील आणि एचसीएल टेक या शेअर्सना मोठा फटका बसला होता. बीएसई बास्केटमधील ३० पैकी केवळ ८ शेअर्स हिरव्या निशाणीवर बंद झाले होते, तर २२ शेअर्समध्ये घसरण नोंदवली गेली होती.