पाच हजारांची लाच घेताना राज्य कर अधिकारी, निरीक्षक जाळ्यात

सोलापूर- नवीन जीएसटी क्रमांक देण्यासाठी पाच हजारांची लाच घेतल्याबद्दल दोघांविरुध्द विजापूर नाका पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. वस्तू व सेवाकर कार्यालयातील राज्य कर अधिकारी महेश जरीचंद चौधरी (वय ४१, रा. जुना उपळाई रोड, धाराशिव) व राज्य कर निरीक्षक आमसिध्द इरण्णा बगले (वय ५०, रा. रेणुकानगर, जुळे सोलापूर) या दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. तक्रारदाराच्या मालकीची कन्स्ट्रक्शन अॅन्ड सव्हिंग फर्म असून त्यांनी फर्मच्या नावे वस्तू व सेवा कर कार्यालयात नवीन जीएसटी क्रमांक मिळण्यासाठी ऑनलाइन अर्ज केला होता. त्या क्रमांकास मंजुरी देण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच घेताना दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहाथ पकडले आहे.