सोलापूरच्या ओंकार जाधवने केले स्वातंत्र्यदिनी किलिमांजारो शिखर सर

सोलापूर:-  मुळचा सोलापूरकर असलेला गिर्यारोहक ओंकार रामचंद्र जाधव यांने १५ ऑगस्ट रोजी आफ्रिकेतील सर्वोच्च शिखर माउंट किलिमांजारो (१९,३४० फूट) सर करून तिरंगा फडकवत स्वातंत्र्य दिन साजरा केला.ओंकारने हे शिखर सर करून  सोलापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे, अशी माहिती एव्हरेस्ट वीर आनंद बनसोडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

         ११ ऑगस्ट रोजी मोशी (टांझानिया) येथून मोहिमेला सुरुवात झाली. तब्बल ९० किमी अंतराची कठीण चढाई पार करून १५ ऑगस्ट रोजी सकाळी ७:३० वाजता -१५ अंश तापमानात शिखर गाठण्यात आले. शिखरावर पोहोचताच ओंकार यांनी भारताचा तिरंगा फडकावला तसेच अवयवदान मोहिमेचा संदेश देत त्याचे महत्त्वही अधोरेखित केले. ओंकार यांनी यापूर्वी एव्हरेस्ट बेस कॅम्प (२०२१) सर केला असून सह्याद्रीतील अनेक किल्ले सर करण्याचा अनुभव त्यांना आहे. 360 एक्सप्लोरर व एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांचे मार्गदर्शन लाभले.  ही मोहीम 360 एक्सप्लोरर आंतरराष्ट्रीय साहसी पर्यटन संस्थेमार्फत आयोजित करण्यात आली होती. या संस्थेची स्थापना २०१७ मध्ये सोलापूरचे पहिले एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांनी केली असून आज ती जगभरातील गिर्यारोहकांना साहसासाठी मार्गदर्शन केले जात आहे.

        आफ्रिकेतील टांझानियामध्ये असलेले माउंट किलिमांजारो (१९,३४१ फूट) हे खंडातील सर्वात उंच पर्वत असून जगभरातील गिर्यारोहकांचे स्वप्न आहे. हा पर्वत ज्वालामुखीजन्य असून त्याची उंची समुद्रसपाटीपासून जवळपास ६ किमी आहे. अनुभव नसल्यास किंवा चुकीच्या गतीने चढाई केल्यास उंचीशी जुळवून घेणे अवघड ठरते. त्यामुळेच योग्य अक्लिमटायझेशन मार्गदर्शन व शिस्तबद्ध नियोजन केल्याशिवाय किलिमांजारोवर चढाई करणे धोकादायक ठरू शकते. या पत्रकार परिषदेस अक्षया बनसोडे, ओंकार जाधव, वासंती जाधव, सत्यम जाधव आदी उपस्थित होते