सोलापूर-मुंबई वंदे भारत एक्सप्रेस आता २० डब्यांची; २८ ऑगस्टपासून नवीन सेवा सुरू

सोलापूर : सोलापूर-मुंबई सीएसएमटी वंदे भारत एक्सप्रेस (२२२२६) आता १६ ऐवजी २० डब्यांची धावणार आहे. चार डबे वाढल्यामुळे ३१२ अतिरिक्त प्रवाशांना या गाडीत प्रवासाची सुविधा मिळणार आहे. ही सुधारित सेवा २८ ऑगस्ट २०२५ पासून सुरू होणार आहे. रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयामुळे सोलापुरातून मुंबई व पुणे येथे जाणाऱ्या प्रवाशांना वेटिंगचा त्रास होणार नाही. सोलापूर-मुंबई सीएसएमटी वंदे भारत एक्सप्रेस १० फेब्रुवारी २०२३ रोजी सुरू झाली. प्रवाशांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. ही गाडी आता मुंबईतून पुढे नाशिकरोड, मनमाड, संभाजीनगर, जालना, नांदेड येथे धावणार असून, नांदेडवरून येणारी वंदे भारत गाडी मुंबईमार्गे सोलापूरला पोहोचणार आहे. सुधारित कोच रचनेनुसार, २० कोचमध्ये २ एक्झिक्युटिव्ह चेअर कार असून त्यात प्रत्येकी ५२ प्रवासी बसू शकतात. तसेच १६ चेअर कारमध्ये प्रत्येकी ७८ आसने असून, लोको पायलट आणि गार्ड केबिन शेजारील २ चेअर कारमध्ये प्रत्येकी ४४ आसनक्षमता आहे. अशा प्रकारे रेल्वेची एकूण आसनक्षमता १,४४० पर्यंत वाढली आहे. वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक योगेश पाटील यांनी सांगितले की, वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये दिलेल्या या नवीन सुविधेचा जास्तीत जास्त प्रवाशांनी लाभ घ्यावा आणि रेल्वे प्रवास अधिक सुकर करावा.” दरम्यान, प्रवासी सेवा संघाचे अध्यक्ष संजय पाटील म्हणाले, सोलापुरातून मुंबई आणि पुणे येथे जाणाऱ्या प्रवाशांना सिद्धेश्वर एक्स्प्रेस व हुतात्मा एक्स्प्रेसमध्ये वेटिंग करावे लागत होते. आता वंदे भारतमुळे खात्रीचे तिकीट मिळेल.”