नांदेडच्या मुखेड नगरपरिषदेत स्नेहा तमशेट्टे अवघ्या 21 व्या वर्षी बिनविरोध नगरसेविका; जिल्ह्यात चर्चेचा विषय
नांदेड – राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांच्या तोंडावर अनेक ठिकाणी बिनविरोध निवडी होत असतानाच मुखेड नगरपरिषदेतून 21 वर्षीय स्नेहा तमशेट्टे यांची बिनविरोध निवड सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. अवघ्या 21 वर्षांच्या वयात नगरसेविका बनल्यामुळे त्या जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय ठरल्या आहेत. राज्यातील 246 नगरपरिषद आणि 42 नगरपंचायत निवडणुकांपूर्वी जवळपास 100 ठिकाणी बिनविरोध निवडणुका झाल्या आहेत. यामध्ये स्नेहा तमशेट्टे यांची निवड सर्वात तरुण नगरसेविका म्हणून नोंदली जात आहे. प्रभाग क्रमांक 4 हा महिला ओबीसी राखीव असून येथे भाजपाने स्नेहा यांच्यावर विश्वास दाखवत उमेदवारी दिली होती. काँग्रेस आणि दोन अपक्ष उमेदवार सुरुवातीला रिंगणात होते, मात्र छाननीवेळी त्यांचे अर्ज बाद झाले. खास म्हणजे स्नेहा यांची चुलती जयश्री तमशेट्टे या अपक्ष म्हणून सामने होत्या; मात्र पुतणीच्या पाठिशी उभे राहत त्यांनी आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतला. या घडामोडींमुळे स्नेहा तमशेट्टे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली, आणि भाजपने नांदेड जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पहिले खाते उघडले. मुखेड नगरपरिषदेसाठी एकूण 20 नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक होत आहे. येथे भाजप, काँग्रेस आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात तिरंगी लढत रंगणार आहे.
स्नेहा तमशेट्टे कोण आहेत?
साध्या कुटुंबातील स्नेहा या बी. फार्मसीपर्यंत
शिक्षित असून कमी वयात निवडून आल्यानंतर त्यांच्या कुटुंबामध्ये आनंदाचे
वातावरण आहे. तरुण नेतृत्वाला पुढे आणणारा हा निर्णय राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा
मानला जात आहे.