स्मृती मानधना–पलाश मुच्छल यांचे लग्न पुढे ढकलले; वडिलांची प्रकृती बिघडली, पलाशलाही तब्येतीचा धक्का

भारतीय क्रिकेटपटू स्मृती मानधना आणि सुप्रसिद्ध संगीतकार पलाश मुच्छल यांचा बहुप्रतिक्षित विवाह २३ नोव्हेंबर रोजी सांगलीत होणार होता. मात्र लग्नाच्या काही तासांपूर्वीच स्मृतीचे वडील श्रीनिवास मानधना यांच्या प्रकृतीत अचानक बिघाड झाल्याने संपूर्ण लग्न सोहळा पुढे ढकलण्यात आला. त्यानंतर तणावामुळे पलाश मुच्छलची तब्येतही खालावली, अशी माहिती त्यांच्या आईने दिली. शुक्रवारपासून लग्नापूर्वीचे सर्व विधी सुरू झाले होते. रविवारी वरात निघण्याची तयारी सुरू असतानाच श्रीनिवास मानधनांना ह्रदयविकारासारखी लक्षणे जाणवू लागली. काही वेळ त्यांनी हे दुर्लक्ष केले, मात्र त्रास वाढल्याने तातडीने त्यांना रुग्णवाहिकेतून रुग्णालयात हलवण्यात आले. पलाशची आई अमिता मुच्छल यांनी ‘हिंदुस्तान टाईम्स’ला सांगितले की, स्मृतीच्या वडिलांची प्रकृती बिघडल्याची बातमी कळताच पलाश मानसिकदृष्ट्या कोसळला. त्याचे आणि स्मृतीच्या वडिलांचे नाते अतिशय घट्ट असल्याने त्याला हे मोठं दुखापतकारक होते. प्रकृती सुधारत नाही तोपर्यंत विवाह पुढे ढकलण्याचा निर्णय स्मृतीपेक्षा आधी पलाशनेच घेतला, असे अमिता मुच्छल यांनी सांगितले.

दरम्यान, पलाशचीही तब्येत अचानक बिघडली. अतिताणामुळे तो भावनिकदृष्ट्या खूप खचला आणि त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले. त्याला सुमारे चार तास निरीक्षणाखाली ठेवून आयव्ही ड्रिप लावण्यात आली. सर्व चाचण्या नॉर्मल आल्या असल्या तरी त्याने खूप मानसिक तणाव घेतल्याचे डॉक्टरांनी सांगितले. उपचारानंतर पलाश आणि त्याचे कुटुंबीय मुंबईला परतले असून तो सध्या विश्रांती घेत आहे. स्मृतीच्या वडिलांवरही रुग्णालयात उपचार सुरू आहेत.