शाळेची फी उशिरा भरल्यामुळे सहावीतील विद्यार्थ्याला खोलीत बंद करून मारहाण; महिला शिक्षकेसह तीन जणांविरोधात गुन्हा

उत्तर प्रदेशातील हापूर येथे एका खाजगी शाळेत सहावीच्या विद्यार्थ्याला फी उशिरा भरल्यामुळे मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विद्यार्थ्याला एका खोलीत बंद करून शिक्षकांनी बेदम मारले, ज्यामुळे त्याच्या शरीरावर गंभीर जखमा झाल्या. ही घटना २५ ऑगस्ट रोजी बाबूगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. विद्यार्थ्याच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या तिन्ही मुलं त्याच शाळेत शिकतात. काही आर्थिक अडचणींमुळे फी वेळेवर भरता आली नाही, यासाठी शाळेकडून वेळही मागितला होता. मात्र, सोमवारी शाळा सुटल्यानंतर शिक्षकांनी फी न भरल्याच्या कारणावरून विद्यार्थ्याला प्रथम शाळेच्या गॅलरीत आणि नंतर एका खोलीत बंद करून मारहाण केली. याबाबत पालकांनी शाळा प्रशासनाला जाब विचारला असता त्यांच्याशीही गैरवर्तन केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पीडित विद्यार्थ्याच्या वडिलांनी थेट पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. पोलिसांनी एका महिला शिक्षिकेसह तीन जणांविरोधात बीएनएसच्या कलम ११५ (२) आणि १२७ (२) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाची पुढील चौकशी सुरू आहे.