फलटण डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात धक्कादायक उघड — PSI बदनेने शोषण केल्याचा फडणवीसांचा विधानसभेत खुलासा

फलटण येथे कार्यरत असलेल्या महिला डॉक्टरच्या मृत्यू प्रकरणाचा तपास सुरू असून विधानसभेत या प्रकरणावर महत्त्वाची माहिती समोर आली आहे. प्रश्नोत्तराच्या तासात अनेक आमदारांनी या प्रकरणाबाबत सरकारची भूमिका विचारली. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धक्कादायक माहिती दिली. फडणवीस म्हणाले की, या प्रकरणात अटकेत असलेल्या PSI बदनेने तरुणीची फसवणूक करून तिचे शारीरिक शोषण केले असल्याचे त्याच्या चॅट्समधून स्पष्ट झाले आहे. लग्नाचे आमिष दाखवून तिचा गैरफायदा घेतल्याचेही तपासात उघड झाले आहे. मुख्यमंत्री म्हणाले, "न्यायवैद्यक अहवालात डॉक्टर तरुणीने हातावर लिहिलेली अक्षरे तिचीच असल्याचे सिद्ध झाले आहे. फॉरेन्सिक तपासातही हे स्पष्ट झाले आहे."

दबावाबाबत माहिती देताना फडणवीस म्हणाले,
डॉक्टर तरुणी ही वैद्यकीय अधिकारी होती. अटकेतील गुन्हेगारांच्या वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्राबाबत काही अनियमितता झाल्याचे दिसून आल्याने यापूर्वी तिच्यावर दडपण आणल्याची बाब चर्चेत आली होती. यासंदर्भात वरिष्ठांनी चौकशीही केली होती. मात्र, ही घटना पाच महिन्यांपूर्वीची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दुसऱ्या आरोपीचीही भूमिका तपासात उघड
फडणवीस म्हणाले की, “एकीकडे PSI बदनेने तरुणीची फसवणूक केली, तर दुसऱ्या आरोपीनेही तिच्या परिस्थितीचा फायदा घेत तिची फसवणूक केली. त्यामुळेच दोघांची नावे लिहून तिने आत्महत्या केली असावी.”

सरकारने दिलेल्या माहितीनुसार,

  • आतापर्यंतचा तपास पूर्ण होत आला आहे,
  • मृत्यू गळफासाने झाल्याचे निष्पन्न झाले आहे,
  • हातावरील अक्षरे तिचीच असल्याचे सिद्ध झाले आहे,
  • तपास महिला IPS अधिकारी करत असून आरोपपत्र लवकर दाखल होणार आहे.

या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी स्वतंत्रपणे सुरू आहे.