सुप्रीम कोर्टात धक्कादायक प्रकार : सीजेआय गवई यांच्यावर वकिलाचा बूटफेक, बार काउंसिलकडून तात्काळ निलंबन
नवी दिल्ली | प्रतिनिधी
सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सकाळी एक धक्कादायक प्रकार घडला. वकील
राकेश किशोर (वय ७१) यांनी भारताचे सरन्यायाधीश (CJI) बी.
आर. गवई यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न केला.
ही घटना सकाळी ११:३५ वाजता न्यायालयात घडली, जेव्हा
खजुराहो येथील मंदिरातील भगवान विष्णूंच्या खंडित मूर्तीबाबतच्या याचिकेवर सुनावणी
सुरू होती.
सुदैवाने बूट सरन्यायाधीशांवर न लागता बाजूला पडला.
तात्काळ सुरक्षारक्षकांनी पुढे धाव घेत राकेश किशोर यांना अटक करून
ताब्यात घेतले.
राकेश किशोर यांचे विधान
हिंदुस्तान टाइम्सच्या वृत्तानुसार,
राकेश किशोर यांनी आपल्या कृत्याबद्दल कसलाही पश्चात्ताप नसल्याचे म्हटले
आहे.
ते म्हणाले –
“मला एका दैवी शक्तीने असे करण्यास
सांगितले. मी तुरुंगात गेलो असतो तर बरे झाले असते. माझं कुटुंब माझ्या या
कृतीमुळे नाराज आहे, पण त्यांना माझं कारण समजत नाहीये.”
या विधानानंतर न्यायालयीन वर्तुळात आणि कायदा व्यवसायात तीव्र
संताप आणि आश्चर्याचे वातावरण निर्माण झाले आहे.
बार काउन्सिल ऑफ इंडियाकडून कारवाई
या घटनेची गंभीर दखल घेत बार काउन्सिल ऑफ इंडिया (BCI) ने राकेश किशोर यांच्यावर तात्काळ प्रभावाने निलंबन लादले आहे.
BCI अध्यक्ष मनन कुमार मिश्रा यांनी जारी केलेल्या आदेशात म्हटले
आहे –
“हे कृत्य न्यायालयाच्या प्रतिष्ठेच्या
विरोधात असून, अधिवक्त्यांच्या आचारसंहितेचे आणि अधिवक्ता
अधिनियम १९६१ चे उल्लंघन करणारे आहे.”
निलंबनाच्या कालावधीत राकेश किशोर यांना कोणत्याही
न्यायालय, प्राधिकरण किंवा अधिकरणात हजर राहण्यास मनाई करण्यात आली आहे.
तसेच त्यांच्या विरोधात अनुशासनात्मक कारवाईही सुरू करण्यात येणार
आहे.