कर्नाटकातील धक्कादायक घटना : गर्भवती विधवेचा विवाह करून फसवणूक, नंतर दुसऱ्या मुलीशी लग्न; न्यायासाठी महिलेकडून पोलिसांकडे धाव

कर्नाटकातील चिक्कबल्लापूर जिल्ह्यातील शिदलाघट्टा तालुक्यातील अंबिगनहल्ली गावात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सुनील नावाच्या ३३ वर्षीय तरुणाने कीर्ती नावाच्या विधवा महिलेशी विवाह केला आणि रीतसर नोंदणीही केली. कीर्ती आठ महिन्यांची गर्भवती असताना सुनीलने तिला घराबाहेर काढले आणि दुसऱ्या मुलीशी लग्न केले. पीडित कीर्तीने न्याय मिळवण्यासाठी सुनीलच्या घरी जाऊन विचारणा केली असता त्याच्या कुटुंबीयांनी व नातेवाईकांनी तिच्यावर मारहाण केली. घटनेची माहिती मिळताच ११२ पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली आणि गर्भवती महिलेला वाचवून चिक्कबल्लापूरच्या मातृ-शिशु रुग्णालयात दाखल केले. यापूर्वीही सुनीलविरोधात कीर्तीच्या पहिल्या मुलीच्या विनयभंगाची तक्रार दाखल झाली होती. त्यावेळी त्याने पत्र लिहून पत्नीची काळजी घेण्याचे आश्वासन दिले होते, मात्र आता पुन्हा विश्वासघात करून दुसरे लग्न केल्याने महिलेने पोलिसांकडे धाव घेतली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.