अहमदाबादमध्ये शाळेत थरार: विद्यार्थ्याची चाकू हल्ल्यात मृत्यू, संतप्त जमावाची तोडफोड

अहमदाबाद : गुजरातच्या अहमदाबाद शहरात धक्कादायक घटना घडली आहे. खोखरा येथील
खासगी शाळेत नववीच्या विद्यार्थ्याने दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकूहल्ला करून
हत्या केली. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या नयन या दहावीतील विद्यार्थ्याचा
उपचारादरम्यान मृत्यू झाला. नयन हा सिंधी समाजाचा होता. त्याच्या मृत्यूनंतर
संतप्त झालेल्या सिंधी समाजातील शेकडो लोकांनी शाळेसमोर जमून आक्रोश केला. यानंतर
इतर संघटना व हिंदूवादी कार्यकर्ते देखील घटनास्थळी पोहोचले. अभाविपसह काही
संघटनांच्या कार्यकर्त्यांनी शाळेत घुसून तोडफोड केली तसेच कर्मचाऱ्यांना मारहाण
केली. पोलिसांची धावपळ गोंधळ वाढल्याने पोलिसांना अतिरिक्त कुमक मागवावी लागली.
पोलिसांनी अल्पवयीन आरोपी विद्यार्थ्याला ताब्यात घेतले असून त्याच्यावर किशोर
न्याय कायद्यानुसार कारवाई केली जात आहे. वादाचे कारण दोघांमध्ये मांसाहारावरून
वाद झाल्याचे सांगितले जात आहे. आरोपी विद्यार्थी हा मुस्लिम समाजाचा असल्याने
घटनेनंतर धार्मिक तणाव वाढला आहे. सिंधी समाजाने केवळ आरोपी विद्यार्थ्यावरच नव्हे
तर शाळेचे मुख्याध्यापक आणि संचालकांविरोधातही गुन्हा नोंदवावा, अशी
मागणी केली आहे. स्थिती तणावपूर्ण
घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. कायदा आणि
सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांकडून विशेष बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.