रुपाली पाटील ठोंबरे यांची मागणी: “विवाहबाह्य संबंधातील त्या महिलेलाही आरोपी करा”
डॉ. गौरी पालवे यांच्या आत्महत्या प्रकरणात नवरा अनंत
गर्जे, सासू आणि नणंद यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. मात्र या प्रकरणातील खऱ्या
गुन्हेगाराला कायद्यातून वाचवू नका, अशी जोरदार मागणी
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी केली आहे.
त्यांनी एका पोस्टद्वारे आपल्या भूमिकेची स्पष्ट व्याख्या केली. ठोंबरे म्हणाल्या,
“डॉ. गौरी पालवे यांचा मृत्यू हा अत्यंत हृदयद्रावक प्रकार आहे.
त्यांच्या वडिलांचा वेदनादायी आक्रोश पाहून हृदय पिळवटून जातं. ‘श्रीमंतांना पोरी
देऊ नका’ असे म्हणत ते अक्षरशः ढसाढसा रडत होते. एक बाप असहाय्य, हतबल झाला होता.” त्या पुढे म्हणाल्या, “घरातील
व्यक्ती आत्महत्या करण्यापूर्वी संवाद, समन्वय आणि समंजसपणा
हा दोन्ही घरांत असणे आवश्यक आहे. मुली सक्षम असतील, मानसिकदृष्ट्या
बलवान असतील तर अनेक प्रसंग टाळता येतात.” यामध्ये त्यांनी विशेष भर दिला तो कथित
विवाहबाह्य संबंधावर. ठोंबरे म्हणाल्या, “डॉ. गौरी आणि त्यांच्या नवऱ्यामध्ये झालेल्या वादाला त्याच्या एक्स्ट्रा
मॅरिटल अफेअरचे कारण होते. नवरा, सासू, नणंद यांच्यावर गुन्हा दाखल झालाच आहे; परंतु
जिच्यासोबत विवाहबाह्य संबंध होते, त्या महिलेलाही आरोपी
करणे गरजेचे आहे.”
त्या म्हणाल्या कि, “एक महिला घर उभं करू शकते आणि घर उद्ध्वस्तही करू शकते. अनैतिक संबंध ठेवणाऱ्या महिलांवरही गुन्हा झालाच पाहिजे, नाहीतर कुटुंब व्यवस्था सुरक्षित राहणार नाही. अशा महिलांना कायद्याची भीती वाटली तर अशा संबंधांचे धाडस होणार नाही.” शेवटी ठोंबरे यांनी आवाहनही केले, “कितीही संकटे आली, वाद झाले तरी आत्महत्या हा पर्याय नाही. कोणाच्याही आयुष्यात हा मार्ग कधीच स्वीकारू नये.” या विधानांमुळे आता प्रकरणातील कथित तिसऱ्या व्यक्तीवर कारवाईची मागणी अधिक तीव्र झाली आहे.