राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शताब्दी उत्सव; मोदींकडून टपाल तिकिट आणि नाण्याचे प्रकाशन, कर्नाटकमध्ये संघाच्या कार्यक्रमांवर बंदीचा प्रस्ताव चर्चेत

नवी दिल्ली | RSS 100 Years Celebration
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) आपला १०० वा वर्धापन दिन देशभरात साजरा करत आहे. या निमित्ताने आयोजित विशेष कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहभागी होत संघाच्या सन्मानार्थ टपाल तिकिट आणि स्मृती नाण्याचे प्रकाशन केले. या कार्यक्रमादरम्यान मोदींनी संघाच्या समाजकार्य आणि राष्ट्रीय एकतेतील भूमिकेचे कौतुक केले. त्यांनी सांगितले की, संघाने देशाच्या संस्कृती आणि परंपरेचे जतन करत समाजाला संघटित करण्याचे काम केले आहे.”

कर्नाटकात RSS कार्यक्रमांवर बंदीचा प्रस्ताव

याच पार्श्वभूमीवर कर्नाटकात एक मोठा राजकीय वाद उफाळला आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि खासदार मल्लिकार्जुन खरगे यांचे पुत्र प्रियांक खरगे, जे राज्यात आयटी मंत्री आहेत, यांनी मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांना पत्र लिहून RSS च्या शाखा आणि कार्यक्रमांवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. त्यांनी पत्रात म्हटलं आहे की, “RSS असंवैधानिक कारवाया करत आहे आणि तरुणांना भडकवून देशाच्या एकता आणि अखंडतेला धोका निर्माण करत आहे.”

सरकारची प्रतिक्रिया आणि तपासाची आदेश

मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांनी प्रियांक खरगे यांच्या पत्राची दखल घेत मुख्य सचिव शालिनी रजनीश यांना या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
सरकार आता या प्रस्तावावर पुढील कारवाईसाठी माहिती गोळा करत आहे.

भाजपचा काँग्रेसवर पलटवार

दरम्यान, भाजपने काँग्रेसवर तीव्र टीका केली आहे. बी.वाय. विजयेंद्र, भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणाले — काँग्रेसला RSS ची वाढती लोकप्रियता पचत नाही. संघाने कधीही अनुशासनभंग केला नाही. संघ देशाच्या रक्षणासाठी नेहमी तयार आहे.” भाजपने हेही म्हटलं की काँग्रेस सरकार आपल्या अपयशावरून लक्ष वळवण्यासाठी RSS ला टार्गेट करत आहे.

राजकीय पार्श्वभूमी आणि अंतर्गत संघर्ष

राज्यात काँग्रेस सरकारमध्ये मुख्यमंत्री सिद्धारामय्या आणि उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांच्यातील अंतर्गत सत्तासंघर्षही उफाळून आला आहे.
काही दिवसांपूर्वीच डी.के. शिवकुमार यांनी विधानसभेत RSS प्रार्थनेतील दोन ओळी वाचून संघाचं कौतुक केलं होतं, ज्यामुळे विरोधाभासी राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे.