रोहित पवारांनी शेअर केला चिमुकलीचा व्हिडीओ; भ्रष्टाचाराविरुद्ध ठाम संदेश देत मुलीने सर्वांचं लक्ष वेधलं

मुंबई :- राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार यांनी भ्रष्टाचाराविरुद्ध ठाम आणि निर्भीडपणे बोलणाऱ्या मराठी शाळेतील एका चिमुकलीचा प्रेरणादायी व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, अनेकांनी त्याचे कौतुक केले आहे. व्हिडीओमध्ये एक लहान मुलगी भ्रष्टाचाराचा अर्थ पूर्णपणे न समजताही, आपल्या वडिलांकडून ऐकलेल्या गोष्टींवरून देशाच्या नुकसानाबद्दल ठामपणे बोलताना दिसते. ती म्हणते, “भ्रष्टाचारामुळे देश फोपवत चालला आहे. इंग्रजांनी जेवढं लुटलं नसेल, त्यापेक्षा जास्त भ्रष्टाचाराने देश लुटला आहे. करोडो-करोडो रुपयांचे घोटाळे करून हे घोटाळेबाज देशाचं नुकसान करत आहेत. मी माकड बनून जगणार नाही, माझ्यासाठी राष्ट्र प्रथम, राष्ट्र सर्वोत्तम आहे आणि मी याविरुद्ध युद्ध नक्की लढेन.” या चिमुकलीने शेवटी “जय जवान, जय किसान, जय हिंद, जय महाराष्ट्र” असा जयघोष करत स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छाही दिल्या. तिचा दमदार संदेश अनेकांच्या मनाला भिडला. रोहित पवारांनी हा व्हिडीओ शेअर करत लिहिलं, “भ्रष्टाचाराविरोधात आम्ही आज लढतोच आहोत, पण पुढची पिढीही तयार होत आहे, हे बघून भारी वाटतंय. हा व्हिडीओ सत्ताधाऱ्यांनी तर नक्कीच पाहावा.” सध्या हा व्हिडीओ जनतेत जागरूकता निर्माण करत असून, चिमुकलीचे विचार भ्रष्टाचाराविरुद्धच्या लढाईचे प्रतीक ठरत आहेत.