अयोध्या राम मंदिराच्या शिखरावर धर्मध्वज फडकला; पंतप्रधान मोदींच्या हस्ते ध्वजारोहण

उत्तर प्रदेशातील अयोध्येत श्रीराम मंदिराच्या शिखरावर आज (मंगळवार) अखेर धार्मिक ध्वज फडकावण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते हे ध्वजारोहण करण्यात आले. या सोहळ्यानंतर राममंदिराचे बांधकाम आता पूर्ण झाल्याचे अधिकृतपणे सांगण्यात आले. ध्वजारोहणापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येत भव्य रोड शो केला, ज्यामध्ये हजारो नागरिकांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. सकाळी पीएम मोदींनी माता अन्नपूर्णा मंदिराला भेट दिल्यानंतर राम दरबार गर्भगृहात आणि नंतर राम लल्ला गर्भगृहात पूजा-अर्चना केली. पीएमओनुसार, मंदिराचा ‘शिखर’ उत्तर भारतीय नागर स्थापत्य शैलीत बांधला असून त्याभोवतीची ८०० मीटर लांबीची भिंत दक्षिण भारतीय स्थापत्य शैलीवर आधारित आहे. या दिवशी नववे शीख गुरु, गुरु तेग बहादूर यांच्या शहीद दिनाचे औचित्य साधले गेले असून त्यामुळे या दिवसाचे आध्यात्मिक महत्त्व आणखी वाढले आहे. ध्वजारोहण हिंदू परंपरेत अधर्मावर धर्माच्या विजयाचे प्रतीक मानले जाते. मंदिराच्या बाह्य भिंतींवर वाल्मिकी रामायणावर आधारित ८७ दगडी कोरीवकाम आहेत, ज्यात प्रभू राम यांच्या जीवनातील महत्वाच्या घटना दर्शवण्यात आल्या आहेत. याशिवाय संपूर्ण परिसरात भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवणारी ७९ कांस्य शिल्पे आहेत. ही सर्व कलाकृती पर्यटकांना आणि भक्तांना भगवान रामाच्या जीवनाची आणि भारतीय वारशाची सखोल ओळख करून देतात.