मराठा आंदोलनावर राज ठाकरे यांचे सुचक वक्तव्य: जरांगे मुंबईत का आले एकनाथ शिंदेंना विचारा

मुंबई : मनोज जरांगे-पाटील मुंबईत का आले? हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच विचारा, असे सूचक विधान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले. मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी शुक्रवारपासून मुंबईतील आझाद मैदानावर पुन्हा उपोषणाला सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना सवाल केला आहे. राज ठाकरे म्हणाले, "जरांगे इथे का आले हे एकनाथ शिंदेंना विचारावं. नवी मुंबई येथे ज्यावेळी जरांगे आले होते तेव्हा शिंदे तिकडे गेले होते. त्यानंतर जरांगे यांनी आंदोलन मागे घेतले होते. परंतू आज पुन्हा त्यांच्यावर ही वेळ का आली, हे शिंदेंनाच विचारावे, असे ते म्हणाले. दरम्यान, मराठा आरक्षण उपसमितीची आज बैठक पार पडली. बैठकीत सर्व मुद्यांवर सकारात्मक चर्चा झाल्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. "मराठा आरक्षण संदर्भात उपस्थित केलेल्या सर्व मुद्द्यांवर आजच्या बैठकीत चर्चा झाली. मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सरकार सकारात्मक आहे. जरांगे यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी आम्ही तयार आहोत, असे विखे पाटील म्हणाले.