राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस एकाच मंचावर; ताज लँड्स हॉटेलमधील कार्यक्रमावर राज्याचे लक्ष

मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे प्रमुख राज ठाकरे आज एका खासगी कार्यक्रमासाठी एकाच मंचावर येणार आहेत. मुंबईतील ताज लँड्स हॉटेलमध्ये माधव अगस्ती यांच्या बॉलिवूड फॅशन इंडस्ट्रीतील ५० वर्षांच्या कारकिर्दीच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात पुस्तक प्रकाशन सोहळा होणार असून, त्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस आणि राज ठाकरे दोघांनाही निमंत्रित करण्यात आले आहे. याआधी "मी शिवाजीराजे भोसले बोलतोय" या चित्रपटाच्या सोहळ्यात हे दोघे एकत्र येणार होते, परंतु त्या वेळी फडणवीस पुण्यात असल्याने उपस्थित राहू शकले नव्हते. मात्र आता अनेक दिवसांनी हे दोघे पुन्हा एकत्र मंचावर येत असल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असताना, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या वाढत्या जवळिकीमुळे राजकीय समीकरणे बदलताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगासह भाजपावर मतचोरीचा आरोप केला होता. त्यामुळे आता त्यांच्या आणि फडणवीसांच्या या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. दोघांमधील व्यक्तिगत सुसंवाद जुना असला तरी, सध्याच्या राजकीय घडामोडींमध्ये या भेटीला प्रतीकात्मक महत्त्व मिळाले आहे. फडणवीस आणि ठाकरे यांच्यातील चर्चेतून कोणते नवे संकेत मिळतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.