सोलापूरात महापूरामुळे रेल्वे ठप्प, माढा तालुक्यात बचावकार्याला वेग; मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री पाहणीसाठी दाखल

सोलापूर | २४ सप्टेंबर २०२५
भीमा व सीना नदीतील महापुरामुळे सोलापूर विभागातून धावणाऱ्या रेल्वे
वाहतुकीवर गंभीर परिणाम झाला आहे. वंदे भारत सिद्धेश्वर एक्सप्रेस सह इतर अनेक
रेल्वे गाड्या उशिराने धावत आहेत. रेल्वे प्रशासनाने माहिती दिली की विजापूरकडून
येणाऱ्या गाड्या होटगी स्टेशनवर थांबविल्या आहेत, कारण
रुळावर पाणी आल्याने पुढे सिग्नल मिळत नाही. या परिस्थितीत पुढील तीन ते चार तास
रेल्वे सेवा सुरू होण्याबाबत कोणतीही निश्चित माहिती देणे शक्य नाही, असे रेल्वे विभागाकडून सांगितले आहे. मुंबई व हैद्राबादकडून येणाऱ्या अनेक
एक्सप्रेस व पॅसेंजर गाड्या विविध स्थानकांवर थांबविल्या आहेत.
बचावकार्य:
माढा तालुक्यातील सुलतानपूर, दारफळ, वकाव व मुंगशी गावांमध्ये पूरग्रस्त
नागरिकांसाठी बचावकार्य सुरु आहे. कालपासून सुरू असलेल्या मोहिमेत काही नागरिकांची
सुटका करण्यात आली आहे. उर्वरित नागरिकांसाठी आर्मी व एनडीआरएफचे पथक कार्यरत
आहेत.
सकाळी साडेनऊ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व दोन्ही
उपमुख्यमंत्री सोलापूर येथे पूरग्रस्त भागाची पाहणी करतील, असे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितले.
- सुलतानपूर: अडकलेल्या नागरिकांना आर्मीमार्फत फूड पॅकेट व
पिण्याचे पाणी पुरवण्यात आले आहे. एनडीआरएफची अतिरिक्त टीम येथे कार्यरत आहे.
- दारफळ: काल आठ नागरिकांचे एअरलिफ्टिंग करण्यात आले; उर्वरित 20 नागरिकांना
आज सकाळपासून पुन्हा बचाव कार्य सुरू आहे. पाण्याची पातळी घटल्याने
बोटीद्वारे बचाव सुरू आहे.
- वकाव: येथे सुमारे 90 नागरिक अडकले असून एनडीआरएफचे
दुसरे पथक बचावासाठी दाखल झाले आहे.
सांगोला तहसीलदार संतोष कणसे बचाव कार्याचे समन्वय साधत
आहेत.
हायलाइट्स:
- सीना व भीमा नदीतील
महापुरामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम
- विजापूरकडून
येणाऱ्या गाड्या होटगी स्थानकावर थांबविल्या
- माढा तालुक्यात
बचावकार्य जोरात सुरू
- मुख्यमंत्री व
उपमुख्यमंत्री पूरग्रस्त भागाची पाहणी करणार
- एनडीआरएफ व आर्मीची
बचाव मोहिमात सहभाग