सोनंदमध्ये जुगारावर छापा; अडीच कोटींचा मुद्देमाल जप्त

सांगोला, दि. 30 -  तालुक्यातील सोनंद येथील मटन भाकरी हॉटेलच्या पाठीमागील शेडमध्ये चालू असलेल्या जुगार अड्ड्यावर पंढरपुर विभागाचे सहायक पोलीस अधीक्षक प्रशांत डंगळे यांनी कारवाई करून दोन कोटी 68 लाख 72 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.  तसेच 50 इसमांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची घटना शुक्रवारी  घडली आहे. सोनंद येथील मटन भाकरी हॉटेलच्या पाठीमागील शेडमध्ये सचिन साहेबराव काशीद (रा.सोनंद) व शंभूलिंग प्रकाश तेरदाळ (रा. अथणी, जि. बेळगावकर्नाटक) हे दोघे विनापरवाना जुगार क्लब चालवीत असल्याची माहिती खबऱ्या मार्फत पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पंढरपूर विभागाचे सहायक पोलीस अधीक्षक डंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली चार पोलीस पथकांनी जुगार अड्ड्यावर छापा टाकला असता त्या शेडमध्ये 50 इसम 52 पत्त्यांचा जुगार खेळत असल्याचे मिळून आले. कसिनो काउंटरमध्ये अवैद्यरित्या बेकायदेशीर देशी विदेशी दारू ही बाळगलेल्या स्थितीत मिळून आली. पत्ते खेळण्याकरता आलेल्या इसमांकडे दुचाकी चार चाकी वाहने, रोख रक्कम पत्त्यावरील रक्कम, मोबाईल, जुगार साहित्य, टेबल, खुर्च्या, पैसे मोजण्याचे मशीन व कुलर्स आदी साहित्य आढळून आले. त्यामध्ये रोख रक्कम 16 लाख 9 हजार 480 रुपये, 62 मोबाईल त्याची किंमत 13 लाख 91 हजार 100 रुपये, 26 चार चाकी वाहने त्याची किंमत दोन कोटी नऊ लाख रुपये, 61 दुचाकी वाहनांची किंमत 29 लाख 60 हजार रुपये, देशी विदेशी दारू किंमत 11 हजार 165 रुपये असा एकूण 2 कोटी 68 लाख 72 हजार 195 रुपये मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. याबाबत सांगोला पोलीस ठाण्यात 50 इसमांवर  गुन्हा दाखल करण्यात आला आहे . ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, सहायक पोलीस अधीक्षक प्रशांत गंडळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विभावरी रेळेकर, फौजदार भारत भोसले, अनिल पाटील, दत्तात्रेय तोंडले, पोलीस कर्मचारी निलेश रोंगे, कामतकर, मंगेश रोकडे, सुजित उबाळे, अरुण कोळवले, सातव, शितल राऊत, संतोष गायकवाड आदींनी केली.