राजकीय तर्कांना उधाण ; आजारी पडल्याने अजित पवार यांचे नियोजित कार्यक्रम रद्द

मुंबई : उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांचे आजचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द केले आहेत. याशिवाय ते मंगळवारी झालेल्या पक्षाच्या बैठकीला देखील उपस्थित नव्हते. त्यांच्या अनुपस्थितीमुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले.मात्र अजित पवार आजारी असल्यामुळे बाहेरच्या कार्यक्रमांना उपस्थित राहू शकणार नसल्याची माहिती त्यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे. अजित पवारांनी काल, मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हजेरी लावली होती. त्यानंतर रात्रीच्या पक्षाच्या बैठकीला तर अनुपस्थित होते.मंगळवारी रात्री वरळी डोम येथे झालेली पक्षाची महत्त्वाची बैठक प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. पक्षाच्या आगामी रणनीती, संघटनात्मक बदल आणि स्थानिक निवडणुकांची तयारी यावर या बैठकीत चर्चा झाली असल्याची माहिती समोर आली आहे.दरम्यान, करमाळ्यातील महिला डीवायएसपी आणि आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट फोनवरून दम दिल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. विरोधकांकडून अजित पवार यांच्यावर टीका केली जात आहे. करमाळा प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा व्हिडिओ समोर आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तर दुसरीकडे, अजित पवारांच्या बचावासाठी त्यांचे पुतणे रोहित पवार उभे राहिले आहेत. अजित पवारांनी दिलगिरी व्यक्त करून देखील जाणीवपूर्वक मीडिया ट्रायल मित्रपक्षाकडून सुरू आहे. पक्षातील दोन आणि तीन नंबरच्या ज्येष्ठ नेत्यांकडून सध्या राष्ट्रवादीच्या मित्रपक्षाला साजेशी भूमिका घेतली जात असून स्वहितासाठी अंतर्गत कुरघोड्या केल्या जात असल्याचा आरोप रोहित पवारांनी केला आहे