पिंपरी मेट्रोची गती वाढली! आता गर्दीच्या वेळेत दर 6 मिनिटांनी ट्रेन

पिंपरी – पुणे मेट्रो प्रवाशांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. येत्या गुरुवार, १५ ऑगस्टपासून मेट्रो गर्दीच्या वेळेत दर ६ मिनिटांनी धावणार आहे. सध्या सकाळी ९ ते ११ आणि दुपारी ४ ते रात्री ८ या गर्दीच्या वेळेत दर ७ मिनिटांनी ट्रेन चालते. मात्र, नव्या बदलामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक जलद आणि सोयीस्कर होणार आहे. विनागर्दीच्या वेळेत मात्र ट्रेन दर १० मिनिटांनी धावेल. सध्या पुणे मेट्रोच्या दोन्ही मार्गिकांवर एकूण ४९० फेर्‍या घेतल्या जातात. ६ मिनिटांच्या अंतराने सेवा दिल्याने अतिरिक्त ६४ फेर्‍या वाढतील आणि एकूण फेर्‍या ५५४ वर पोहोचतील. यामुळे प्रवाशांना गर्दीचा त्रास कमी होईल. महामेट्रोने गेल्या दोन महिन्यांपासून हा बदल करण्यासाठी तांत्रिक चाचण्या आणि तयारी केली होती. सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर आता हा निर्णय अमलात येत आहे. जुलै महिन्यात मेट्रोलाच चांगला प्रतिसाद मिळाला असून, दैनंदिन प्रवासी संख्या १ लाख ९२ हजारांवरून ऑगस्टमध्ये सरासरी २ लाख १३ हजार ६२० पर्यंत पोहोचली आहे. पिंपरी मेट्रो स्टेशनवर प्रवासी संख्या विक्रमी असून, महसूलही वाढला आहे. महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी सांगितले की, प्रवासी संख्येत सातत्याने वाढ होत असल्याने दैनंदिन फेर्‍यांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. १५ ऑगस्टपासून ४९० ऐवजी ५५४ फेर्‍या होणार आहेत.