“लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय” — सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर राजकीय वादंग; अखेर दिलगिरी व्यक्त

मुंबई, 10 ऑक्टोबर 2025 —लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय. आम्हाला निवडून यायचं असतं, म्हणून निवडणुकीत काहीतरी आश्वासन द्यावं लागतं. पण लोकांनी ठरवायला हवं की नेमकं काय मागायचं,” असं वादग्रस्त वक्तव्य राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केलं. त्यांच्या या विधानानंतर राज्यातील शेतकरी नेते, विरोधक आणि सत्ताधारी गटातीलही काही नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. वाढत्या दुष्काळी परिस्थिती, घटलेले उत्पादन आणि आत्महत्यांचा संदर्भ देत अनेकांनी हे वक्तव्य असंवेदनशील असल्याचं म्हटलं. या वक्तव्यानंतर त्यांच्या स्वतःच्या पक्षातील मंत्री छगन भूजबळ यांनी देखील नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, “नाद लागलाय असं म्हणणं चुकीचं आहे. हे आमच्या नेत्याचं अयोग्य विधान आहे. अजितदादा पवार नक्कीच या प्रकरणाकडे लक्ष देतील,” असं त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनीही या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “लातूरसारख्या दुष्काळग्रस्त भागातून आलेल्या माणसाकडून असं वक्तव्य होणं म्हणजे सत्तेची झूल डोक्यावर चढल्याचं लक्षण आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या, कमी भाव, वाढलेला उत्पादन खर्च — या सगळ्यांमध्ये शेतकऱ्यांचा संसार उद्ध्वस्त झाला आहे. आणि त्याला नाद लागलाय म्हणायचं?” शेट्टी यांनी पुढे महायुतीवर हल्ला चढवत म्हटलं, “महायुतीचे सर्वच नेते ताळतंत्र सोडले आहेत. जनता त्यांना त्यांची जागा दाखवेल.” राजकीय वर्तुळात या वक्तव्यामुळे प्रचंड खळबळ उडाली असून, दबावानंतर बाबासाहेब पाटील यांनी अखेर आपले विधान मागे घेत दिलगिरी व्यक्त केली आहे.