संचार साथी अॅपवरून देशात वाद; सरकारचे स्पष्टीकरण आणि प्रियंका गांधींचा हेरगिरीचा आरोप चर्चेत.
देशात सध्या Sanchar Saathi App वरून सत्ताधारी आणि
विरोधकांमध्ये मोठा वाद निर्माण झाला आहे. केंद्र सरकारने हे अॅप सर्व नवीन
स्मार्टफोनमध्ये प्री-इन्स्टॉल करण्याचे निर्देश दिल्यानंतर विरोधकांनी तीव्र
प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य
सिंधिया यांनी महत्त्वाचे स्पष्टीकरण दिले आहे. केंद्रीय मंत्री सिंधिया म्हणाले,
“Sanchar Saathi अॅप कोणाचीही हेरगिरी करत नाही आणि कोणाच्याही
कॉल्सवर लक्ष ठेवत नाही. जर तुम्हाला अॅप वापरायचे असेल तर ते सक्रिय करा;
नसेल तर सक्रिय करण्याची गरज नाही. ते अनिवार्य नाही आणि नागरिक हवे
असल्यास ते डिलीटही करू शकतात.” त्यांनी पुढे सांगितले की, “या
अॅपचा उद्देश नागरिकांना ऑनलाइन फसवणूक, सायबर गुन्हे आणि
डिजिटल फ्रॉडपासून वाचवणे हा आहे. नागरिकांसाठी अशी सुविधा उपलब्ध करणे ही सरकारची
जबाबदारी आहे.”
प्रियंका गांधींचा सरकारवर हेरगिरीचा गंभीर आरोप दरम्यान, काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वाड्रा यांनी या निर्णयावर टीका करताना सरकारवर थेट हेरगिरीचा आरोप केला आहे. दूरसंचार विभागाने सर्व नवीन मोबाइल हँडसेटमध्ये Sanchar Saathi अॅप प्री-इन्स्टॉल करण्याचे निर्देश दिल्याने हा वाद उद्भवला आहे. माध्यमांशी बोलताना प्रियंका गांधी म्हणाल्या, “Sanchar Saathi हे हेरगिरी करणारे अॅप आहे. नागरिकांना गोपनीयतेचा अधिकार आहे. सरकारच्या तपासणीशिवाय कुटुंबीयांना किंवा मित्रांना संदेश पाठवण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. सरकार देशाला हुकूमशाहीकडे नेत आहे.”
त्या पुढे म्हणाल्या, “हे फक्त फोनवर नजर ठेवण्याबद्दल नाही.
संसद चालू नाही, सरकार कोणत्याही विषयावर चर्चा करण्यास नकार
देत आहे. निरोगी लोकशाहीमध्ये वेगवेगळ्या मतांना स्थान असते.” लोकसभा सदस्या
प्रियंका गांधी यांनी फसवणुकीच्या तक्रारी आणि नागरिकांच्या गोपनीयतेची तुलना
करताना म्हटले, “फसवणूक रोखणे आवश्यक आहे, पण त्यामुळे नागरिकांच्या प्रत्येक फोनमध्ये घुसखोरी करण्याचे कारण मिळू
नये. कोणाचाही यावर आनंद होणार नाही.”