क्रीडा मंत्री माणिकराव कोकटे यांना कुठल्याही क्षणी अटक होणार?; जिल्हा कोर्टाने सुनावला निकाल
नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने राज्याचे क्रीडामंत्री
माणिकराव कोकाटे यांना सदनिका घोटाळा प्रकरणात दोन वर्षांची सक्तमजुरी आणि दहा
हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे. मंगळवारी (दि. १६) जिल्हा व सत्र
न्यायाधीश पी. एम. बदर यांनी हा निकाल दिला. शिक्षेची अंमलबजावणी तातडीने करण्याचे
आदेश अतिरक्त मुख्य न्यायदंडाधिकारी रुपाली नरवाडिया यांना देण्यात आले आहेत. या
निकालामुळे माणिकराव कोकाटे तसेच त्यांचे बंधू विजय कोकाटे यांना अटकेचे समन्स
कधीही बजावले जाऊ शकतात. याआधी नरवाडिया यांच्या न्यायालयाने दिलेला दोषसिद्धीचा
निकाल सत्र न्यायालयानेही कायम ठेवला आहे. मुख्यमंत्री स्वेच्छाधिकार योजनेतील दहा
टक्के राखीव कोट्यातून नाशिक शहरातील कॅनडा कॉर्नर परिसरात असलेल्या एका
अपार्टमेंटमधील चार सदनिका बनावट कागदपत्रांच्या आधारे बेकायदेशीररीत्या
मिळवल्याचा आरोप कोकाटे बंधूंवर आहे.
नेमकं प्रकरण काय?
१९९५ साली मुख्यमंत्री कोट्यातून कमी दरात मिळणाऱ्या सदनिकांच्या
कागदपत्रांमध्ये फेरफार करून फसवणूक केल्याचा आरोप माणिकराव कोकाटे यांच्यावर
करण्यात आला होता. यासंदर्भात माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी याचिका दाखल केली
होती. या प्रकरणी नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला
होता. १९९७ पासून सुरू असलेल्या या खटल्यात एकूण चार आरोपी होते. अखेर दीर्घ
सुनावणीनंतर न्यायालयाने कोकाटे बंधूंना शिक्षा सुनावली आहे.